Abhijeet Dipke Father Funding Source RTI : सुरत येथील एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या वडिलांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली असून, महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त कर्मचारी असलेल्या त्यांच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी कसा खर्च केला, असा सवाल उपस्थित केला आहे. अमित तिवारी असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

कपिल सिब्बल यांच्या निधीचीही चौकशीची मागणी

राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी पोलीस कारवाईला सामोरे जाणाऱ्या आंदोलकांसाठी १ कोटींची कायदेशीर संरक्षण निधीची तरतूद केली. या निधीचीही चौकशी व्हावी याकरता अमित तिवारी यांनी केंद्रीय निवडणूक आयोग आणि कर अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. तिवारी यांनी अभिजीत दिपके यांचे वडील भगवानराव दिपके यांच्या आर्थिक स्थितीची चौकशी करण्याची मागणी करताना, ते एक सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी असल्याचे आणि त्यांच्या मुलाने परदेशात उच्च शिक्षण घेतल्याचे नमूद केले आहे. याशिवाय, तिवारी यांनी CJP च्या अधिकृत दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, राजकीय पक्षाच्या नावाखाली काम करत असताना हा गट अशा प्रकारे निधी स्वीकारू शकतो का, असा सवाल केला आहे.

“कॉक्रोच जनता पार्टी ही एक नोंदणी नसलेली संस्था आहे, तरीही ती राजकीय पक्ष म्हणून काम करत आहे. जर तिला कायदेशीर संरक्षण निधी म्हणून १ कोटी देण्याचे आश्वासन दिले गेले असेल, तर निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या कलम २९ अ अंतर्गत CJP ची नोंदणी झाली आहे की नाही, याची पडताळणी करावी”, असं तिवारी म्हणाले.

“जर नोंदणी झाली नसेल, तर राजकीय पक्षाच्या नावाखाली काम करणं आणि निधी गोळा करणं किंवा प्राप्त करणं या बाबींची चौकशी करण्याची गरज आहे”, असंही त्यांनी संगितलं. तिवारी यांनी केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाशी देखील संपर्क साधला असून, कपिल सिब्बल यांनी कायदेशीर संरक्षण निधीसाठी प्रस्तावित केलेल्या १ कोटींच्या योगदानावर जीएसटी लागू होईल का, याची तपासणी करण्याची विनंती केली आहे.

अभिजीत दिपकेंना विदेशी शिक्षणासाठी कोणी मदत केली?

दरम्यान, औरंगाबादमध्ये वाढलेला मुलगा अमेरिकेपर्यंत कसा पोहोचला याबाबत अभिजीत दिपके यांनी काही माध्यमांना मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं. त्यानुसार, त्यांनी म्हटलं की, “मी सुरुवातीला औरंगाबादहून पदव्यूत्तर शिक्षणासाठी पुण्यात गेलो. पुण्यातून मला आम आदमी पक्षात इंटर्नशिप करायची संधी मिळाली. त्याकरता मी दिल्लीत गेलो. दिल्लीत गेल्यानंतर तिथे मला बरंच एक्स्पोजर मिळालं. विदेशातून शिकून आलेले आणि विदेशात शिकायला जाणारे बरेच विद्यार्थी मित्र तिथे भेटले. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी आणि करिअरकरता मीही विदेशात जाण्याचा निर्णय घेतला. चांगला जॉब मिळावा याकरता मी विदेशात शिकायला गेलो. बॉस्टन युनर्व्हसिटीकडून मला स्कॉलरशिप मिळाली. थोडंफार कर्ज काढलं. २ वर्षे मी अमेरिकेत होतो.”