Abhijeet Dipke Hunger Strike : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांबरोबर २१ दिवसांपासून उपोषणाला बसले होते. त्यांच्या आंदोलनाला विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत होता. तसेच सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला अनेक राजकीय नेत्यांनी देखील पाठिंबा देत आंदोलनस्थळी भेटी दिल्या. मात्र, आज (१८ जुलै) सकाळी दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवलं आणि रुग्णालयात दाखल केलं.

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, सोनम वांगचुक यांना आवश्यक वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. त्यामुळे या आंदोलनाला पूर्णविराम मिळणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत असतानाच कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. या संपूर्ण घडामोडी दरम्यान जंतर-मंतरवर मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं.

या घडामोडी दरम्यानच अभिजीत दीपके यांच्यावर एका महिलेने शाईफेक केल्याची घटना घडली आहे. अभिजित दीपके यांच्यावर शाईफेक करण्यात आल्यामुळे जंतर-मंतरवर पुन्हा एकदा मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

नेमकं काय घडलं?

अभिजित दीपके हे जंतर-मंतरवरील आंदोलकांना संबोधित करत होते. मात्र, या दरम्यान अचानक एका महिलेने अभिजित दीपके यांच्यावर शाई फेकली. त्यामुळे आंदोलनस्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला. यावेळी आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या आंदोलकांनी त्या महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिलं असून पोलीस सध्या तिची चौकशी करत असल्याची माहिती समोर येत आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.

अभिजीत दीपके यांनी काय प्रतिक्रिया दिली?

जंतर-मंतरवरील आंदोलकांना संबोधित करत असताना अभिजित दीपके यांच्यावर एका महिलेने शाईफेक केली. या घटनेनंतर अभिजित दीपके यांनी ‘एक्स’ (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. ‘निळा माझा आवडता रंग आहे’, असं अभिजीत दीपके यांनी म्हटलं आहे.

अभिजीत दिपकेंचं बेमुदत उपोषण सुरू

गेल्या २१ दिवसांपासून जंतर-मंतर येथे बेमुदत उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी शनिवार सकाळी रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी शनिवारी बेमुदत उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली. “मी आजपासून अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू करत आहे. मी सर्वांना आवाहन करतो मागे हटू नका. हे आंदोलन आणखी मोठं होईल. त्यांनी एक मोठी चूक केली आहे. मी सर्वांना जंतर-मंतर येथे येण्याचं आवाहन करतो. आपलं आंदोलन येथून पुढे सुरू राहील आणि २० जुलै रोजी नियोजित असलेला आपला मोर्चा आपण पुढे नेऊ”, असं अभिजीत दीपके म्हणाले.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी जंतरमंतर येथील आंदोलकांना लवकरात लवकर जागा रिकामी करण्याचं आवाहन केलं आहे. सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर आंदोलनस्थळी दिल्ली पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.