Abhijeet Dipke Jantar Mantar Protest Warning : दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतर हे आंदोलने आणि निदर्शनांसाठीचे अधिकृत ठिकाण म्हणून रद्द केले असून, अशा जाहीर सभांसाठी तीन पर्यायी जागांची घोषणा केली आहे. दरम्यान, यावरून आता अभिजीत दिपके यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
अभिजीत दिपके म्हणाले, “आंदोलनासाठी अधिकृत असलेल्या जागांच्या यादीतून जंतर मंतर वगळण्यात आलं आहे. ते आता आंदोलनाचे ठिकाण राहिलं नाही, कारण तसंही त्या भ्याड हुकूमशाहाने त्याचं युद्धभूमीत रूपांतर केलं होतं. आता संपूर्ण देश जंतरमंतर बनेल!”
लोकशाहीची अधिसूचनाही रद्द करतील
कॉक्रोच जनता पार्टीचे नेते सौरव दास यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “नरेंद्र मोदी जंतर-मंतरला का घाबरत आहेत? जंतर-मंतर भारताच्या जनतेचं आहे. गृह मंत्रालयाने भारताच्या जनतेचा सल्ला घेतला होता का? कोणत्याही भागधारकांशी सल्लामसलत केली होती का? कोणत्याही संघटनांशी चर्चा केली होती का? लिहून घ्या, ज्याप्रमाणे ते जनतेच्या जंतर-मंतरची अधिसूचना रद्द करत आहेत, तसंच पंतप्रधान लवकरच भारतातील लोकशाहीची अधिसूचना रद्द करतील. हे पाऊल त्याच दिशेने आहे. हा मनमानी निर्णय आम्हाला मान्य नाही. हा लोकांच्या शांततापूर्ण एकत्र येण्याच्या आणि निषेध करण्याच्या मूलभूत अधिकारावर झालेला हल्ला आहे. आता संपूर्ण देश जंतरमंतर बनत आहे!”
कॉक्रोच जनता पार्टीला शांततापूर्ण आंदोलन करण्याची परवानगी देण्यावरून झालेला वाद आणि ‘इंडिया’ आघाडीच्या सर्वोच्च न्यायालयावरील नियोजित मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत वाढवण्यात आलेल्या सुरक्षेच्या दरम्यान हे पाऊल उचलण्यात आलं आहे. ११ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या स्थायी आदेशानुसार, रामलीला मैदान, सीबीडी ग्राउंड आणि बुरारी ग्राउंड ही तीन नवीन नियुक्त केलेली ठिकाणे आहेत. विशेष म्हणजे, ही तीन ठिकाणे मध्य दिल्लीत असलेल्या जंतर-मंतरपासून अनुक्रमे ३ किमी, १३.५ किमी आणि ४४ किमी अंतरावर आहेत.
सीजेपीने मागितलं स्पष्टीकरण
सीजेपी आणि दिल्ली पोलीस यांच्यात जंतरमंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करण्याच्या परवानगीवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा आदेश आला आहे. सीजेपीच्या नेत्यांनी सोमवारी पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यातून बाहेर पडताना, आंदोलनासाठी तारीख देण्यात यावी अशी मागणी केली. तसेच परवानगी नाकारण्याबाबत स्पष्टीकरण मागितलं.
सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास म्हणाले की, पक्षाने शांततापूर्ण आंदोलन करण्याच्या आपल्या हेतूविषयी पोलिसांना रीतसर कळवलं होतं आणि पोलिसांनी ती माहिती स्वीकारलीही होती. मात्र, आंदोलनासाठी कोणतीही तारीख देण्यात आलेली नाही आणि पक्षाला या निर्बंधांविषयी कोणतंही स्पष्टीकरण मिळालेलं नाही, असं त्यांनी सांगितलं. “आम्हाला तारीख देण्यासाठी आम्ही त्यांना २४ तासांचा वेळ दिला आहे”, असं सांगत दास यांनी इशारा दिला की, जर पोलिसांनी या मुदतीत प्रतिसाद दिला नाही तर सीजेपी मोर्चा काढण्याची घोषणा करेल.
