१० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या देशभरातल्या तरुण आणि ‘जेन झी’च्या आंदोलनापूर्वी कॉक्रोच जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी ज्ञानेश कुमार यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे. “ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत देशातील तरुण मागे हटणार नाहीत,” असा इशारा त्यांनी दिला आहे. यातच आता कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी थेट PIB Fact Check ला टॅग करत केलेली एक पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या एका प्रसिद्धी पत्रकावरून सोशल मीडियावर मोठा गदारोळ सुरू होता. हे प्रसिद्धी पत्रक निवडणूक आयोगाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावरून हटवले आहे का? अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. आशुतोष रांका यांनी या मुद्द्यावरून काही प्रश्न उपस्थित करत निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर निशाणा साधला होता.

याच वादाच्या पार्श्वभूमीवर अभिजीत दिपके यांनी PIB Fact Check च्या अधिकृत एक्स हँडलला टॅग करत अत्यंत खोचक शब्दांत पोस्ट लिहिली:

“प्रिय @PIBFactCheck, कृपया ते प्रसिद्धी पत्रक पोस्ट करा आणि या @AshutoshRanka चं तोंड बंद करा. खूप बोलतो हा!”

पीआयबीने दिलं स्पष्टीकरण

केंद्र सरकारच्या PIB Fact Check ने तात्काळ अधिकृत स्पष्टीकरण जारी केले. पीआयबीने स्पष्ट केले की, “२६ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले पत्रक सार्वजनिक व्यासपीठावर उपलब्ध असून, ते भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) काढलेले नाही किंवा हटवलेले नाही.”

ज्ञानेश कुमारांविरोधात ‘इंडिया’ आघाडी आक्रमक

मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेवरून राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ (INDIA) आघाडीने आज आपला मोर्चा थेट केंद्रीय निवडणूक आयोग आणि राष्ट्रपती भवनाकडे वळवला आहे. या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाभोवती आणि महत्त्वाच्या संवेदनशील भागात सुरक्षा यंत्रणांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.