Abhijeet Dipke Press Conference updates on Gyanesh Kumar controversy: कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी गुरुवारी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर कडाडून टीका केली. “निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांना वाचविण्यासाठी या दोघांनी स्वतःच्या देशातील लोकांविरुद्ध युद्ध पुकारले आहे. ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मागणाऱ्या आंदोलकांना, विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात डांबण्याचे कारण काय?”, असा सवाल दिपके यांनी यावेळी विचारला. दरम्यान या पत्रकार परिषदेत काही लोकांनी घुसखोरी करत गोंधळही घातला. दिपके आणि इतरांविरोधात त्यांनी घोषणाबाजी केली.

पत्रकार परिषदेत बोलत असताना अभिजीत दिपके यांनी सीजेपीचे सह-संयोजक सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या तिहार तुरुंगातील न्यायालयीन कोठडीवरून संताप व्यक्त केला. एका माणसासाठी देशातील तरुणांना आणि विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात डांबले जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

अभिजीत दिपके पुढे म्हणाले, “विरोधी पक्ष आणि दिल्लीतील तरुण रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करत आहेत. त्यांना पोलीस रस्त्यावरून फरफटत नेत आहेत. नेहा, आएशा आणि इतर अनेक विद्यार्थी नेत्यांना पोलिसांनी फरफटत ताब्यात घेतले. माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, पिनराई विजयन यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांना ताब्यात घेतले. हे कशासाठी? एकट्या ज्ञानेश कुमार यांच्यासाठी एवढे का सुरू आहे?”

१० ऑक्टोबरच्या आंदोलनाबाबत बोलताना दिपके म्हणाले, या आंदोलनापूर्वी रेल्वे, मेट्रो सेवा बंद करण्यात आली. एवढे सगळे कुणाला वाचविण्यासाठी सुरू आहे.

पत्रकार परिषदेत अज्ञातांचा गोंधळ

दरम्यान पत्रकार परिषदेची सुरुवात झाल्यानंतर नेहा बोरा संबोधित करत असताना काही अज्ञातांनी घोषणाबाजी करत पत्रकार परिषदेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली आणि पत्रकार परिषदेत खंड पडला. मात्र त्यानंतर गोंधळ घालणाऱ्यांना बाहेर काढण्यात आले आणि पत्रकार परिषद पुढे गेली. यावेळी अभिजीत दिपके यांनी आरोप केला की, ५०, १०० रुपयांसाठी हे लोक इथे गोंधळ घालत आहेत. त्यांना पैसे देऊन टाका, म्हणजे ते निघून जातील. यानंतर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला.

तिरंग्यापेक्षा ज्ञानेश कुमार मोठे आहेत का?

आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी फक्त तिरंगा फडकवला म्हणून त्यांना ताब्यात घेण्यात आले. भाजपाला तिरंग्याची अडचण काय? ज्ञानेश कुमार हे तिरंग्यापेक्षा मोठे आहेत का?, असा प्रश्न उपस्थित करताना दिपके यांनी म्हटले की, यांना पूर्वीपासून तिरंग्याचा तिटकारा आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांच्यापैकी कोण होते, हे विचारले तर ते सांगू शकणार नाहीत. यासाठीच ते सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, सरदार वल्लभभाई पटेल यांना स्वतःकडे ओढतात. तुमच्यापैकी कोण स्वातंत्र्याच्या चळवळीत होते, हे तर सांगा. म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत बराच काळ तिरंगा फडकवला जात नव्हता, अशी टीका अभिजीत दिपके यांनी केली.