Abhijit Dipke on Sansad Chalo March: कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आणि त्यांचे सहसंयोजक आशुतोष रांका आणि सौरव दास हे त्रिकुट आता चांगलेच प्रसिद्ध झालेले आहे. सीजेपीची स्थापना झाल्यापासून या त्रिकुटाने सरकारला हैराण केले. जेन-झी पिढीला शिक्षणाच्या मुद्द्यावर रस्त्यावर उतरायला भाग पाडून त्यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळवला. २० जुलै रोजी दिल्लीच्या जंतर-मंतर येथून संसदेवर काढलेला मोर्चा आणि त्यावर पोलिसांनी अतिरेकी बळाचा वापर केल्यामुळे सीजेपीला मोठी प्रसिद्धी मिळाली. मात्र या मोर्चात अभिजीत दिपके एकटेच दिसत होते. याबद्दलची आठवण त्यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितली आहे.
२० जुलै रोजी ‘संसद चलो’ मोर्चात सौरव दास आणि आशुतोष रांका दिसले नाहीत, त्यामुळे मी संतापलो होतो, अशी आठवण सांगताना दिपके यांनी ते दोघे कुठे होते, हेही सांगितले.
अभिजीत दिपके म्हणाले, “माझ्या उपोषणाचा तो दुसरा दिवस होता. मोर्चा निघाला त्या दिवशी दास आणि रांका भाजपाच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी गेले होते. त्यांच्यातली बैठक केवळ १० मिनिटे चालली. मात्र त्यांना तब्बल पाच तास तिथे थांबवून ठेवण्यात आले होते.”
‘फोनही लागला नाही आणि ते आलेही नाहीत’
“मोर्चात सहभागी झालेला जमाव पुढे जाण्यासाठी अधीर झाला होता. उपोषणाचा तिसरा दिवस असल्यामुळे त्यांच्यात मोर्चाचे नेतृत्व करण्याची ऊर्जा नव्हती. आशुतोष रांका आणि सौरव दास यांना अनेकदा फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे फोन लागत नव्हते. ते दोघे मोर्चेकऱ्यांना हाताळण्यासाठी उपलब्ध नसल्याने मी संतापलो होतो”, अशी आठवण अभिजीत दिपके यांनी सांगितली.
दिपके म्हणाले की, मी त्यादिवशी मोर्चेकऱ्यांना सांगत होतो की, आपण पुढे जाणार आहोत. मात्र आपल्याला जबाबदारीने वागायचे आहे. आपण असे काहीही करायचे नाही, ज्यामुळे आपल्यालाच अडचण निर्माण होईल. त्याच दरम्यान मी सौरव आणि आशुतोषला सारखा फोन करत होतो. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नव्हता, त्यामुळे मी फारच वैतागलो होतो.
संसदेवर काढलेल्या मोर्चात पोलिसांच्या कारवाईचा सामना करावा लागला. तसेच सीजेपीचे नेते उपस्थित नव्हते, अशी टीकाही करण्यात आली. अशावेळी त्यादिवशी काही वेगळे करता आले असते का? असा प्रश्न दिपके यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “मी त्या दोघांना बैठकीला उपस्थित न राहण्याचा सल्ला दिला असता.”
‘उपोषणाच्या दिवशी पहाटे बेशुद्ध पडलो’
सोनम वांगचुक यांना पोलिसांनी जंतर-मंतरवरून उचलून नेल्यानंतर अभिजीत दिपके यांनी स्वतः उपोषण सुरू केले होते. उपोषणादरम्यान काय करावे आणि काय करू नये, याची त्यांना कल्पना नव्हती. पहिले दोन दिवस ते जमावाला संबोधित करत राहिले. त्यांच्याशी संवाद साधत राहिले. यामुळे तिसऱ्या दिवशी त्यांच्यात अशक्तपणा आला होता. त्या दिवसाची आठवण सांगताना ते म्हणाले, “माझ्यात अजिबात ताकद नव्हती. उपोषणादरम्यान काय करायचे असते, याची मला कल्पनाच नव्हती. मोर्चाच्या दिवशी पहाटे मी बेशुद्धही पडलो होतो. त्यामुळेच मी ट्रकवर होतो. कारण मला चालताही येत नव्हते.”
त्यादिवशी सौरव दास आणि आशुतोष रांका मोर्चाच्या ठिकाणी असते तर गर्दी सांभाळणे आणि मोर्चाचे नेतृत्व करणे अधिक सोपे गेले असते, असेही अभिजीत दिपके म्हणाले.
