Abhijeet Dipke criticizes PM Narendra Modi over action against memes and Gen-Z: कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आंदोलनाच्या माध्यमातून मिळवण्यात यशस्वी झाल्यानंतर चर्चेत आहेत. तरुणांना जागृत करून त्यांना आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर आणणाऱ्या दिपकेंची सध्या जोरदार चर्चा आहे. या आंदोलनानंतर त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका सुरू केली आहे. पंतप्रधान मोदींच्या इन्स्टाग्राम व्हिडीओवर त्यांनी टीका केली होती. आता त्यांनी आंदोलकांवर दाखल होत असलेल्या गुन्ह्यांवरून पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे.

अभिजीत दिपके ४० दिवसानंतर छत्रपती संभाजीनगरमधील आपल्या घरी परतले आहेत. न्यूज तकला आज त्यांनी विस्तृत मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांना या आंदोलनातून काय शिकायला मिळाले? असा प्रश्न विचारण्यात आला. आंदोलनात विविध विचारसरणीचे लोक शिरले होते, त्यांनी शिवीगाळ केली, असेही दिपकेंना विचारण्यात आले होते. त्यावर ते म्हणाले की, मी शिवीगाळाचे अजिबात समर्थन करत नाही. कुणालाच शिवीगाळ करायला नको. पण सरकारच्या वतीने उपरोधिक मीम बनविणाऱ्यांनाही लक्ष्य केले जात आहे.

विश्वगुरूंना घाबरण्याची गरज काय?

“ते (पंतप्रधान मोदी) या भूतलावरील सर्वात शक्तीशाली व्यक्ती असल्याचा दावा करतात. ते विश्वगुरु आहेत. विश्वगुरूंना मुलांच्या विनोदाला घाबरण्याची गरज काय? त्यांनी जोक, मीम्सला घाबरण्याची गरज नाही. जेन-झींची स्वतःची अभिव्यक्तीची शैली आहे. ते आपले म्हणणे मांडण्यासाठी विनोदबुद्धीचा वापर करतात. त्यावरून उपरोधिक शैलीतील मीम्स बनवितात”, असेही अभिजीत दिपके म्हणाले.

अभिजीत दिपके पुढे म्हणाले, “पोलीस लाठ्या चालवतात त्यावर प्रत्युत्तर म्हणून ही मुले मीम्स बनवितात. मला नाही वाटत लोकशाहीत यापेक्षा आणखी काही चांगली गोष्ट असू शकते. जिथे क्रूरतेला विनोदाने प्रत्युत्तर दिले जात आहे.”

‘मला नेता बनवू नका’

अभिजीत दिपके आता नेता झाला आहे का? असाही प्रश्न या मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. यावर अभिजीत यांनी आपण नेता नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी म्हटले, लोक एखाद्याला नेता किंवा हिरो बनवून टाकतात. लोक एखाद्याला हिरो बनवून टाकतात आणि त्याच्याकडून परिवर्तन घडेल, अशी अपेक्षा करतात. क्रिकेटपटू, सेलिब्रिटी आणि राजकारणी यांच्याबाबत अनेकदा ही चूक होती. त्यामुळे मला हिरो बनवू नका, असे मी आवाहन करतो.

राजकारणात जाणार का?

अभिजीत दिपकेंचे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर अनेक नेते येऊन त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यामुळे अभिजीत दिपके आगामी काळात राजकारणात प्रवेश करणार का? अशी अटकळ बांधली जात आहे. याबद्दल प्रश्न विचारला असता आपण कधीच राजकारणात प्रवेश करणार नाही, असे अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केले.

न्यूज तकला दिलेल्या मुलाखतीत त्यांना विचारण्यात आले की, अरविंद केजरीवाल यांनीही राजकीय पक्षात जाणार नाही, असे आश्वासन दिले होते. मात्र नंतर त्यांनी स्वतःचाच पक्ष काढला. यावर अभिजीत दिपके म्हणाले की, मी कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही. आम्हाला आता कॉक्रोच जनता पार्टीचे व्यासपीठ मिळाले आहे. आम्ही हेच पुढे नेऊ आणि यामाध्यमातून सरकारवर दबाव टाकण्याचे काम करू.