Abhijeet Dipke slapped Jaipur: कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या कानाखाली मारल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (१५ जून) उघडकीस आला. जयपूर, राजस्थानमध्ये आंदोलनावेळी दिपकेंवर काही जणांना हल्ला केल्याचा हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी आवाज उठवत असलेल्या दिपकेंच्या जयपूर येथील आंदोलनावेळी ही घटना घडली. याप्रकरणी आता दिपकेंनी पहिली प्रतिक्रिया दिली असून, “एकदा नाही दहावेळी कानाखाली मारली तरी मूळ मुद्यावरुन विचलित होणार नाही, धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावाच लागेल”, असे दिपकेंनी स्पष्ट केले आहे.

हा धमकावण्याचा, भीती दाखवण्याचा प्रयत्न – अभिजीत दिपके

“जयपूरमधील आंदोलन खूपच मोठे होते, शांततापूर्ण मार्गाने झालेले हे आंदोलन यशस्वी झाले. दिवसेंदिवस हे आंदोलन मोठे होत आहे”, असे दिपके जयपूरमधील आंदोलनावर बोलताना म्हणाले. “आज घडलेला प्रकार भीती दाखवण्याचा, धमकावण्याचा आणि मूळ मुद्यावरुन लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे. पण, आपल्याला विचलित व्हायचं नाही. आपला एकच मुद्दा आहे आणि तो म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावाच लागेल”, अशा शब्दात दिपकेंनी हल्ल्यानंतर त्यांची भूमिका मांडली.

दहा वेळा कानाखाली मारा पण…

“एक कोटीं विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. काहींनी आत्महत्या केली आहे, त्यासाठी प्रधान यांना राजीनामा द्यावाच लागेल. त्यामुळे एकदा नव्हे दहावेळा हल्ला करा, कानाखाली मारा पण आम्ही बोलत राहू की, धर्मेंद्र प्रधान तुम्हाला राजीनामा द्यावाच लागेल”, असे दिपके म्हणाले. “समोरून कितीही हल्ले झाले तरी आमच्याकडून हल्ला होणार नाही, असे स्पष्ट करताना हे आंदोलन शांततापूर्ण मार्गाने सुरु असून, तसेच सुरु राहील”, असेही दिपकेंनी सांगितले. द्वेष करणाऱ्या दिपकेंनी ‘गेट वेल सून’ असाही संदेश दिला.

शांतता व प्रेमाने लढण्याचा निर्धार

दुसऱ्या एका पोस्टमध्ये दिपकेंनी, “शारीरिक हल्ले हे भित्रेपणाचे लक्षण आहे. आम्ही शांततेने आमचा आवाज उठवत राहू. मी गांधी आणि आंबेडकरांचा अनुयायी आहे आणि मी ही लढाई शांतता व प्रेमाने लढत राहीन”, अशा शब्दात भूमिका स्पष्ट करत, “शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल”, असा उल्लेख केला.

जयपूर आंदोलनावेळी मारहाण

अभिजीत दिपकेंनी आज नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी जयपूर, राजस्थानमध्ये आंदोलन केले. दिपकेंच्या या आंदोलनाला हजारो समर्थकांनी हजेरी लावली होती. दरम्यान, दिपकेंना समर्थकांनी खांद्यावर उचलून घेतल्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली. दिपकेंनी खांद्यावरुन खाली ओढण्याचा प्रयत्न करत ३ ते ४ वेळी कानाखाली लगावण्यात आली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

हल्लेखोर ताब्यात

दिपकेंवर हल्ला झाल्यानंतर जमावाने हल्लेखोराला ताब्यात घेत चांगलाच चोप दिला. पण, दिपकेंनी हल्लेखोराला सोडून देण्याची आणि मारहाण न करण्याचे आवाहन केले. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ हल्लेखोराला ताब्यात घेतले.