नीट पेपरफुटीविरोधातील सुमारे ३७ दिवसांच्या आंदोलनानंतर ‘कॉक्रोच जनता पार्टी’नं (CJP) आपल्या पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट केली आहे. प्रत्यक्ष निवडणूक राजकारणात उतरण्याऐवजी, देशातील व्यवस्था बदलासाठी आणि जनतेच्या हक्कासाठी एक भक्कम ‘दबाव गट’ (प्रेशर ग्रुप) म्हणून काम करण्याचा निर्णय सीजेपीनं घेतला आहे.

संघटनेचे संस्थापक अभिजित दिपके यांनी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित बैठकीपूर्वी पत्रकारांशी बोलताना ही घोषणा केली. ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार सीजेपी आता इथेनॉलमिश्रित इंधन (E20) धोरण, देशातील वाढती बेरोजगारी आणि झारखंडमधील स्पर्धा परीक्षांच्या गैरव्यवहाराविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावर आपले लक्ष केंद्रित करणार आहे.

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये महत्त्वाची बैठक: सीजेपीच्या कोअर टीमची दोन दिवसीय आढावा बैठक सुरू आहे.
  • राजकारणात प्रवेश नाही: प्रत्यक्ष निवडणूक न लढवता ‘दबाव गट’ म्हणून काम करण्याचा निर्णय.
  • नवे मुद्दे: इथेनॉल इंधन धोरण (E20), वाढती बेरोजगारी आणि झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा.
  • कायदेशीर मदत: आंदोलनात सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांवरील ‘एफआयआर’ (FIR) रद्द करण्याची मागणी. ‘राजकीय पक्षांवरून जनतेचा विश्वास उडाला आहे’

पत्रकार परिषदेत बोलताना अभिजित दीपके यांनी देशातील सध्याच्या राजकीय स्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “देशातील जनता राजकीय पक्ष, न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमे आणि निवडणूक आयोग यांसारख्या महत्त्वाच्या संस्थांवरील विश्वास गमावून बसली आहे. आपल्या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळाला, कारण हा केवळ शिक्षणाचा प्रश्न नव्हता, तर या संस्थांमधील उत्तरदायित्वाचा मुद्दा होता.”

राजकीय पक्षांच्या सद्यस्थितीवर टीका करताना दीपके म्हणाले, “आज राजकीय पक्षांची अवस्था अत्यंत बिकट आहे. मतदार सकाळी एका पक्षाला मतदान करतात आणि संध्याकाळी वेगळेच सरकार स्थापन होते. म्हणूनच भारताला आता नवीन राजकीय पक्षाची नव्हे, तर व्यवस्थेवर अंकुश ठेवणाऱ्या एका स्वतंत्र ‘प्रेशर ग्रुप’ची गरज आहे.”

झारखंड आंदोलन आणि इथेनॉल धोरणावर लक्ष

सीजेपीने आता आपल्या लढ्याचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या इथेनॉलमिश्रित इंधन (E20) धोरणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि वाढती बेरोजगारी या मुद्द्यांवर आता व्यापक जनजागृती केली जाईल. याशिवाय, झारखंडमध्ये परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराविरोधात उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांनाही सीजेपीने पाठिंबा जाहीर केला आहे.

विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी

सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी सांगितले की, देशात आधीच शेकडो राजकीय पक्ष अस्तित्वात आहेत, मात्र तरीही तरुणांचे आणि नागरिकांचे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे सीजेपी हा राजकीय पक्ष न बनता तळागाळातील एक वैचारिक चळवळ म्हणून काम करेल.

दास पुढे म्हणाले: “नीट आंदोलनादरम्यान ज्या विद्यार्थ्यांवर एफआयआर (FIR) दाखल करण्यात आले आहेत, ते मागे घेण्यासाठी आम्ही सरकारी प्रतिनिधींशी चर्चा करत आहोत. तसेच देशातील विविध विद्यार्थी आंदोलनांत जखमी झालेल्या तरुणांना कायदेशीर आणि वैद्यकीय मदत पुरवण्याचे काम सीजेपीकडून सुरू आहे.”

पर्यावरण आणि शिक्षण क्षेत्रातील प्रसिद्ध कार्यकर्ते सोनम वांगचुक हे सीजेपीचे मार्गदर्शक (मेंटर) म्हणून कायम राहतील आणि संघटना त्यांच्या सल्ल्यानेच पुढील पावले उचलणार असल्याचे दास यांनी स्पष्ट केले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये रणनीतीची आखणी

तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नीट आंदोलनाचा ३७ दिवसांचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथे सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके, प्रवक्ते सौरव दास, वैष्णवी गौर आणि इतर वरिष्ठ सहकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत आंदोलनाचा आढावा घेऊन संघटनेच्या राज्यव्यापी आणि देशव्यापी विस्ताराचा अंतिम आराखडा तयार केला जात आहे.