दिल्लीमध्ये ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीने जे आंदोलन पुकारलं आहे त्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. मुंबईहून दिल्लीत आलेल्या अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका या तिघांना दिल्ली पोलिसांनी शनिवारी विमानातूनच ताब्यात घेतलं. आता या तिघांना प्रतिबंधात्मक ताब्यात ठेवलं जाणार आहे आणि दिल्ली कॅन्ट पोलीस ठाण्यात कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केलं गेलं होतं. या तिघांची न्यायालयाने सशर्त सुटका केली आहे.
वकील रत्ना सिंह यांनी पोस्ट करत दिली माहिती
वकील रत्ना सिंह यांनी एक्स पोस्ट करत ही माहिती दिली आहे. कॉक्रोच जनता पार्टीने ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी करत १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाची हाक दिली. मात्र कार्यकर्ते आणि नेते जंतर-मंतरवर पोहचण्यापूर्वीच त्यांना ताब्यात घेण्यात येत होतं. आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आज नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. अभिजीत दिपके, आशुतोष आणि सौरव यांना दिल्ली पोलिसांनी नक्की कुठे ठेवले, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. सीजेपीच्या कार्यकर्त्यांकडून आरोप केला जात होता की, यांच्यासोबत आमचा कोणताही संपर्क होत नाहीये. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी होण्यापूर्वीच त्यांच्या महत्वाच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस अलर्ट मोडवर आहेत. दरम्यान आता न्यायदंडाधिकाऱ्यांनी अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची प्रतिबंधात्मक ताब्यात या कारवाईतून सुटका केली आहे. मात्र वर्षभर शांततेचा भंग करता येणार नाही अशी अटही त्यांना घातली आहे.
जंतर-मंतरला छावणीचं स्वरुप
दिल्लीतील अनेक व्हिडीओ आणि फोटो पुढे येत आहेत. आजच्या सीजेपीच्या आंदोलनाचे प्रतिनिधित्व अजिंक्य शिंदे करत आहेत. आज अभिजीत दिपके जंतर मंतरवर पोहोचणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टी आज दुसऱ्या दिवशी देखील दिल्लीच्या जंतरमंतर आंदोलन करण्यावर ठाम आहे. तसंच अभिजित दिपके यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक ताब्यात घेतलं होतं पण त्यांची आता सशर्त सुटका करण्यात आली आहे. दरम्यान अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जातं आहे. शनिवारप्रमाणेच रविवारीही दिल्लीतल्या जंतर-मंतर परिसराला छावणीचं स्वरूप आलं आहे. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी पाहण्यास मिळतो आहे. पोलिसांनी या परिसरातील ३७ स्पॉट पूर्णपणे बंद केले आहेत. आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी वल्लभ पंथ मार्गावर मोठ्या प्रमाणात राखीव बसेस उभ्या करण्यात आल्या आहेत
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन सुरूच राहणार
आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीत दाखल झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना विमान लँड होताच विमानामध्येच ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपके यांच्या आजीचे निधन झाल्याचे त्यांना कळवण्यात आले असून त्यांना घरी परतण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी पोलिसांनी दर्शवली आहे. दरम्यान, आंदोलनाचे नेतृत्व करणारे सीजेपीचे अजिंक्य शिंदे यांनी आपली भूमिका ठाम असल्याचे स्पष्ट करत, “मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील,” असा इशारा दिला..
