छत्रपती संभाजीनगर : “जंतर-मंतरवरील आंदोलकांना पोलिसांकडून त्रास दिला जात आहे. पण, विद्यार्थ्यांना कमी लेखण्याची चूक सरकारने यापुढे तरी करू नये. पोलिसांचा त्रास वाढला, तर पुन्हा आंदोलन करू,” असा इशारा देत अभिजित दिपके यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या संसदेतील स्वागतावरही आक्षेप घेतला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये ४७ दिवसांनी आलेल्या दिपके यांचे विमानतळावर फुले उधळून स्वागत करण्यात आले. या वेळी ‘संविधान जिंदाबाद’ आणि ‘जय भीम’च्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी दीपके यांचे स्वागत केले.
लोकशाहीमध्ये सरकारला लोकांसमोर झुकावेच लागेल. त्यात नवे काही झाले नाही, असे जंतर-मंतरच्या आंदोलनाचे वर्णन करत दिपके म्हणाले, की “आंदोलनादरम्यान पॅलेट गोळी मारण्याचे कारणच काय होते? ते काही दहशतवादी नाहीत. देशाच्या नागरिकांना गोळी मारताच कामा नये. ज्या कोणी आंदोलकांना गाेळी मारण्याचा आदेश दिला, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी.” कंगना राणावत यांच्या टीकेवर, ‘‘त्या काही गंभीर आणि पूर्णवेळ राजकारणी नाहीत. अर्धवेळ काम करणाऱ्यांवर बोलण्याची इच्छा नाही,” अशी प्रतिक्रिया अभिजीत यांनी दिली.
आनंदोत्सवात गैर काय? आनंदोत्सव साजरा करताना पार्टी केली, असा आक्षेप घेतला जातो आहे, त्यावर बोलताना दिपके म्हणाले, की ३६ दिवस ४५ अंशांच्या उन्हात आणि पावसात विद्यार्थी आंदोलन करत संघर्ष केला आहे. त्यानंतर एवढा मोठा विजय मिळाला आणि आनंदोत्सव केला तर त्यात गैर काय? भाजपवाले निवडणूक जिंकल्यानंतर रस्त्यावर माज करतात. सगळे कार्यकर्ते एका जागी गेले; त्यांनी आनंद साजरा केला त्यात काय बिघडले! आम्ही रस्त्यावर माज दाखवला नाही, असे दिपके म्हणाले.
आता घरी आलो आहे, आईच्या हातचे जेवायचे आणि झोपायची इच्छा आहे. – अभिजीत दिपके, संस्थाप, ‘सीजेपी’
