केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात देशभरात विरोधक आंदोलन करत आहेत. ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. या मागणीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी, कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीने दिल्लीत आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून दिल्लीत मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत.

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. या कारवाईनंतर सीजेपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. आता अभिजीत दिपके यांनी आणखी एका आंदोलनाची घोषणा केली आहे. दिल्लीतील सेंट्रल पार्क कनॉट प्लेस या ठिकाणी १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता तिरंगा मोर्चाची घोषणा दिपके यांनी केली आहे.

अभिजीत दिपके काय म्हणाले?

“तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सीजेपीच्या सौरव दास, आशुतोष रांका यांना फक्त तिरंगा फडकवल्यामुळे तुरुंगात टाकण्यात आलं आहे. आता मी सर्व देशभक्तांना आवाहन करत आहे की, जे-जे लोक तिरंग्यावर प्रेम करतात त्यांना माझं आवाहन आहे की, १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता दिल्लीतील सेंट्रल पार्क कनॉट प्लेस या ठिकाणी सर्वांनी या. त्या ठिकाणी आपण तिरंगा मोर्चा काढणार आहोत. सरकारला दाखवून देऊ की तिरंगा फडकवणं हा गुन्हा नाही. जे लोक दिल्लीत येऊ शकत नाहीत, त्यांनी आपआपल्या शहरात १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता तिरंगा मोर्चा काढा”, असं अभिजीत दिपके यांनी म्हटलं आहे.

‘ज्ञानेश कुमारांविरोधातील लढ्यात फूट पाडण्याचा डाव’

अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत एक मोठं वक्तव्य केलं. इंडिया आघाडीच्या मोर्चावर अप्रत्यक्ष भाष्य करत केंद्र सरकार आपल्याला (इंडिया आघाडी आणि सीजेपी) एकमेकांविरोधात उभं करत आहे, असा आरोप अभिजीत दिपके यांनी केला. दिपके म्हणाले की, “जेव्हा कॉक्रोच जनता पार्टीला आंदोलन करण्याची परवानगी मिळाली, तेव्हा अनेकांनी लगेच असे तर्क मांडले की आम्हाला भाजपाने मुद्दाम तिथं पाठवलं होतं. इंडिया आघाडीने एक मोठं आंदोलन केलं, पण १० ऑक्टोबरला आमच्या बाबतीत जशी कठोर कारवाई झाली, तसं इंडिया आघाडीबाबत काही घडलं नाही. केंद्र सरकार नेमकं याच पद्धतीने आपल्याला एकमेकांविरुद्ध उभं करतंय. वेगवेगळ्या आंदोलनांशी वेगवेगळ्या प्रकारे वागणूक देऊन ते अशा लोकांमध्ये संशय आणि अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, जे मुळात एकाच ध्येयासाठी लढत आहेत”, असा आरोप अभिजीत दिपके यांनी केला.

“माझी सर्वांना एक विनंती आहे की, त्यांचा हा डाव ओळखा. आज ते एका आंदोलनाला परवानगी देऊ शकतात आणि दुसरं आंदोलन दडपू शकतात. उद्या ते या भूमिकांची अदलाबदलही करू शकतात. सत्तेत असलेल्यांना जाब विचारण्याऐवजी आपण एकमेकांवरच संशय घेत राहावं, हाच त्यामागचा उद्देश आहे. कट-कारस्थानांच्या अशा चर्चांमुळे आपल्यात फूट पडू देऊ नका. जेव्हा आपण एकजुटीने उभं राहायला हवं, तेव्हा आपापसात भांडणात अडकू नका. हा लढा ज्ञानेश कुमार आणि त्यांना संरक्षण देणाऱ्यांविरुद्ध आहे, हे कधीही विसरू नका”, असं अभिजीत दिपके यांनी इंडिया आघाडीला उद्देशून म्हटलं आहे.