Abhijit Dipke CJP PM Modi Question: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी उशीरा रात्री एक व्हिडीओ प्रसिद्ध करत, जंतर मंतरवर शिवीगाळ करणाऱ्या विद्यार्थ्यांना माफ केल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदींनी या व्हिडीओच्या माध्यमातून युवकांना एकत्र येऊन देशासाठी काम करुया असे आवाहन देखील केले. मोदींच्या या व्हिडीओनंतर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंंनी एक प्रश्न उपस्थित केला आहे. दिपकेंनी पंतप्रधान मोदींच्या इन्स्टाग्रामवरील व्हिडीओवर कमेंट करत त्यांना प्रश्न केला आहे.

अभिजीत दिपकेंचा पंतप्रधान मोदींना प्रश्न

अभिजीत दिपकेंंनी, “तुम्ही त्यांना फक्त रीलमध्येच माफ कराल की खटलेही मागे घ्याल?,” असा पंतप्रधान मोदींना प्रश्न केला आहे. दिपके यांनी पंतप्रधान मोदींच्या इन्स्टाग्राम व्हिडिओवर कमेंट केली आहे. नीट पेपरफुटी विरोधात जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनावेळी एका युवतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी केली होती. याप्रकरणी या युवतीविरोधात झिरो एफआयआर देखील दाखल झाला होता. सीजेपीकडून याप्रकरणी निषेध देखील नोंदविण्यात आला होता. अशाप्रकारे गुन्हा दाखल करणे योग्य नसल्याचे प्रवक्त सौरव दास यांनी म्हटले होते.

आंदोलकांना माफ केल्याचं जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी उशीरा रात्री एक व्हिडीओ प्रसिद्ध करत शिवीगाळ करणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांना माफ केल्याचे म्हटले आहे. “दिशा भरकटलेली ही मुलं आहेत, त्यांना योग्य रस्ता दाखवणं आपलं काम आहे. त्यांना शिक्षा देणं, न्यायालयाच्या फेऱ्या मारायला लावणं यामुळे परिस्थिती बदलणार नाही, मला त्यांना माफ करायचंय”, असे म्हणत मोदींनी आंदोलकांना माफ केल्याचे जाहीर केलं.

मुलांना रस्ता दाखविण्याची वेळ

तसेच, “समाजात जो आक्रोश आहे त्याला मी व्यवस्थितपणे समजू शकतो. हा एकप्रकारचा सांस्कृतिक धक्का आहे, आमच्या मुली अशाप्रकारची भाषा कशी वापरु शकतात? पण, या मुलांना मिठीत घेऊन, योग्य रस्ता दाखविण्याची हीच वेळ आहे”, असेही मोदींनी व्हिडीओत पुढे म्हटले आहे.

….म्हणून आपण दात तोडत नाही – पंतप्रधान मोदी

“समाजानं पण माझं हे बोलणं स्वीकारावे, कराण कधी – कधी आपल्याच दाताखाली आपली जीभ येते, रक्त येतं पण आपण दात तोडत नाही. कारण दातही आपले आणि जीभही आपलीच आहे. मुलं देखील आपलीच आहेत. त्यांनी रस्ता दाखवणं आपलं काम आहे. भरकटलेल्यांना योग्य रस्ता दाखवणं कठीण काम आहे, पण हे कठीण काम करायचं आहे”, असे पंतप्रधान मोदी संदेशात पुढे म्हणाले आहेत.