झारखंड लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झालेल्या कथित गैरव्यवहाराविरोधात रांचीमध्ये पेटलेल्या विद्यार्थी आंदोलनाचे लोण आता थेट दिल्लीतील संसदेपर्यंत पोहोचले आहे. गेल्या काही दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करणारे विद्यार्थी नेते देवेंद्र नाथ महातो यांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
‘कॉक्रोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी मंगळवारी देवेंद्र महातो यांच्याशी फोनवरून संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांच्या संघर्षाचे कौतुक केले.
“देवेंद्रभाई, तुमच्या धैर्याला आणि जिद्दीला आमचा सलाम! तुम्ही झारखंडच्या तरुण पिढीचा बुलंद आवाज आणि प्रेरणा आहात. या लढ्यात आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभे आहोत. देशातील तरुणांना तुमच्यासारख्या लढवय्या नेतृत्वाची गरज आहे.” – अभिजीत दिपके, संस्थापक, कॉक्रोच जनता पार्टी
अन्नत्याग आंदोलनामुळे देवेंद्र महातो यांची प्रकृती खालावली असून, सोमवारी विधानसभेकडे मोर्चा नेण्यापूर्वी पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात ते जखमी झाले होते. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संसदेच्या ‘मकर द्वारा’वर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी
झारखंडमधील आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या बळप्रयोगावरून मंगळवारी संसदेच्या आवारात प्रचंड राजकीय गदारोळ पाहायला मिळाला. संसदेच्या मुख्य ‘मकर द्वारा’वर सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि विरोधी ‘इंडिया’ आघाडीचे खासदार आमनेसामने आले.
दोन्ही बाजूंनी हातात फलक घेऊन एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. परिस्थिती चिघळू नये म्हणून तेथे तैनात सुरक्षारक्षकांनी दोन्ही बाजूंच्या खासदारांमध्ये मानवी साखळी तयार केली.
सत्ताधाऱ्यांचा राहुल गांधींवर निशाणा
रालोआच्या खासदारांनी संसद ग्रंथालयाकडून मकर द्वाराकडे मोर्चा काढत काँग्रेस आणि झारखंडमधील सत्ताधारी जेएमएम-काँग्रेस आघाडी सरकारविरोधात निदर्शने केली. भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकंत दुबे यांनी आरोप केला की, “काँग्रेस नेते राहुल गांधी देशातील विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरून आणि चर्चेपासून पळ काढत आहेत.”
तर भाजप खासदार कंगना रणौत यांनी झारखंड सरकारवर हल्लाबोल करत म्हटले, “झारखंडमध्ये निष्पाप विद्यार्थ्यांवर अतोनात अत्याचार केले जात आहेत. त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारले गेले, अश्रूधूर सोडण्यात आला आणि क्रूरपणे लाठीचार्ज करण्यात आला. या दडपशाहीचे उत्तर सत्ताधाऱ्यांना द्यावेच लागेल.”
विरोधकांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे उत्तर मागण्याची मागणी
दुसरीकडे, विरोधकांनी केंद्र सरकार आणि पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसदेच्या आवारात निदर्शने केली.
विरोधी पक्षांनी जुलै महिन्यात दिल्लीत नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईचा आणि झारखंडमधील लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध केला. “आंदोलक विद्यार्थ्यांवर पेलेट गन आणि लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले, याचे उत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत दिले पाहिजे,” अशी आक्रमक भूमिका विरोधकांनी घेतली.
‘विद्यार्थ्यांवरील पोलिस दडपशाही अमानुष’
देवेंद्र महतो यांच्याशी झालेल्या संवादानंतर अभिजीत दिपके यांनी पोलिसांच्या कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला. ते म्हणाले, “गेल्या ९ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या देवेंद्र महतो यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली, ज्यामध्ये ते जखमी झाले आहेत. जंतरमंतर असो वा झारखंड, हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांवरील ही पोलिस दडपशाही अत्यंत क्रूर आहे.”
विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाने आणि संसदेतील गदारोळाने झारखंडमधील सत्ताधारी महाआघाडी विरुद्ध केंद्र सरकार असा थेट सामना रंगल्याचे चित्र स्पष्ट दिसत असून आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
