नवी दिल्ली : परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ‘कॉक्रोच जनता पक्षा’ने शनिवारी आंदोलनाच्या आवाहनाकडे राजधानीचे लक्ष लागले आहे. समाजमाध्यमांवरून सुरू झालेल्या या युवकांच्या मोहिमेचे संस्थापक अभिजीत दिपके हे अमेरिकेतील बोस्टनहून शनिवारी सकाळी दिल्लीत दाखल होणार आहेत. यानंतर दिपके आणि सोनम वांगचुक जंतरमंतरवरील आंदोलनासाठी पोलिसांकडे परवानगी मागणार आहेत.

दिपके यांनी सामाजिक माध्यमांवर ‘संविधानावर विश्वास ठेवून भारतात परतत आहे’ असा संदेश देत आंदोलनाच्या तयारीला वेग दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या ‘कॉक्रोच जनता पक्षा’ने गेल्या महिन्यात सामाजिक माध्यमांवर मोठी चर्चा निर्माण केली होती. आता ही ऑनलाइन मोहीम प्रत्यक्ष रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे.

बुधवारी संविधान क्लबमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रवक्ते सौरव दास यांनी सर्व राजकीय विचारांच्या नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. हा कोणत्याही पक्षाचा नव्हे तर युवकांचा प्रश्न असल्याचे सांगत आंदोलनाला पक्षीय झेंडे न आणण्याचे आवाहनही करण्यात आले.

याचिकेवर तातडीने सुनावणीस नकार

या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा दावा करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. विमानतळ, मेट्रो स्थानके आणि महत्त्वाच्या मार्गांवर अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने शुक्रवारी या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला.

गावाकडे पोलिसांकडून खबरदारी

अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. त्यांचे कुटुंबीय राहत असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील सिडको/वाळूज परिसरात एका अधिकाऱ्यासह १० पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हिंगोलीतील त्यांच्या मित्रांनी व गावातील सरपंचांनी हे आंदोलन शांततेत पार पडावे आणि सर्वांनी नियमांचे पालन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.