नवी दिल्ली : ‘सीजेपी’चे संस्थापक अभिजित दिपके यांनी मोर्चापूर्वीच आपल्याला ताब्यात घेतले जाईल, अशी भीती व्यक्त केली होती. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) राष्ट्रीय प्रवक्ते अनिश गवांदे यांच्या करोल बाग परिसरातील निवासस्थानी जात दिल्ली पोलिसांनी दोन नोटिसा बजावल्या. दिपके संध्याकाळी सेंट्रल पार्ककडे मोर्चासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यावर, ‘तिरंगा फडकावणे हाही गुन्हा आहे का,’ असा सवाल दिपके यांनी केला.
पोलिसांनी बजावलेल्या नोटिशीत ‘सेंट्रल पार्क परिसरामध्ये जमावबंदी लागू असून दिपके यांना मोर्चा काढता येणार नाही तसेच, मोर्चात सहभागी होता येणार नाही. तसे केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल,’ असे नमूद करण्यात आले होते. दिपके यांच्याकडून पोलिसांनी शांततेचे उल्लंघन न करण्यासंदर्भातील कागदपत्रांवर स्वाक्षरी घेतली. या कारवाईवर दिपकेंनी संताप व्यक्त केला. ‘‘मी हिंसेबद्दल काही बोललो का, याचा व्हिडीओ पुरावा दाखवा. तुम्ही या कागदांवर काहीही लिहा. हा सगळा प्रकार भयानक आहे. तुम्ही मला फाशी द्या,” अशा शब्दांत दिपकेंनी आक्षेप नोंदवला. त्यावर, पोलिसांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला.
पोलिसांच्या या कारवाईनंतरही संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास सेंट्रल पार्ककडे मोर्चासाठी जात असताना पोलिसांनी दिपके यांना ताब्यात घेतले. महात्मा गांधींचे छायाचित्र असलेला टी-शर्ट घालून ते घराबाहेर पडले होते. पोलिसांनी ताब्यात घेतले तेव्हा त्यांच्या हातात तिरंगा होता. ‘‘आम्ही फक्त तिरंगा फडकवणार होतो. त्यालाही परवानगी नाही का,’ असा सवाल त्यांनी पोलिसांना केला.
‘तिरंग्याचे छायाचित्र काढून निघून जा’
दिपके यांना ताब्यात घेतल्याच्या कारवाईचा ‘सीजेपी’ने निषेध केला. आंदोलकांनी मोठ्या संख्येने एकत्र येण्याऐवजी लहान गटांत शांततेने सेंट्रल पार्कवर यावे व तिरंगा हातात धरून छायाचित्र काढावे, त्यानंतर तिथून निघून जावे, असे आवाहन ‘सीजेपी’च्या वतीने करण्यात आले. शांततेने तिरंगा हातात घेण्याचा नागरिकांचा अधिकारही प्रशासनाने नाकारला, असा आरोप ‘सीजेपी’ने केला. लोकशाहीत सत्ताधाऱ्यांना जाब विचारणे म्हणजे अराजकता नव्हे, तर तो लोकशाहीचा मूलभूत भाग आहे, अशी भूमिका दिपके यांनी समाजमाध्यमांवरील पोस्टमधून मांडली.
