भारतीय हवाई दलातील विंगकमांडर अभिनंदन वर्धमान यांना संरक्षण दलामध्ये दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च ‘वीरचक्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी लाडऊ विमानांना पळवून लावताना २७ फेब्रुवारीच्या सकाळी आकाशात जो संघर्ष (डॉगफाइट) झाला त्यामध्ये वर्थमान यांनी पाकिस्तानचे अत्याधुनिक एफ १६ फायटर विमान पाडले होते. त्यांनी दाखवलेल्या या शौर्यासाठी त्यांचा ‘विरचक्र’ पुरस्काराने सन्मान होणार असल्याचे ‘हिंदुस्तान टाइम्स’ने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. मात्र यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा सरकारमार्फत करण्यात आलेली नाही.

वर्धमान यांची कामगिरी

भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी फायटर विमानांना पळवून लावताना २७ फेब्रुवारीच्या सकाळी आकाशात भारतीय हवाईदल आणि पाकिस्तानी हवाई दलाच्या विमाने समोरासमोर आली. यावेळी अभिनंदन यांनी मिग २१ बायसन विमानातून पाकिस्तानच्या एफ १६ फायटर विमानावर वर आर- ७३ मिसाइल डागले. या झटापटीमध्ये पाकिस्तानी विमानांनी डागलेले अॅमराम मिसाइल वर्धमान यांच्या मिग २१ बायसन विमानाला धडकले.

त्यानंतर अभिनंदन यांचे मिग-२१ पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले. त्यामुळे अभिनंदन पॅराशूटच्या सहाय्याने खाली उतरताना पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले. भारताने चहूबाजूंनी पाकिस्तानवर राजनैतिक दबाव आणल्यानंतर दोन दिवसांनी पाकिस्तानने अभिनंदन यांना भारताकडे सोपवले.