Abhishek Banerjee Assault triggers political storm : तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्यावर शनिवारी जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, भाजपा नेत्यांनी आणि एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने रुग्णालयावर दबाव टाकून त्यांना डिस्चार्ज दिला, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. या कथित हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अभिषेक बॅनर्जी यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आणि हल्ल्यानंतर त्यांच्या शरीरात रक्ताच्या गाठी (ब्लड क्लॉट्स) तयार झाल्याचा दावा केला. त्या म्हणाल्या की, त्यांना अतिदक्षता विभागात (ITU) दाखल करण्यात आले होते आणि त्यांची ३डी सीटी स्कॅन, अल्ट्रासोनोग्राफी (USG) आणि थोरॅसिक (छातीची) तपासणी यांसह अनेक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या.

तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर शनिवारी पश्चिम बंगालमधील सोनारपूर भेटीदरम्यान हल्ला झाला होता. तिथे ते निवडणूक निकालानंतर झालेल्या हिंसेतील पीडितांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेले होते. या भेटीदरम्यान बॅनर्जी यांच्यावर अंडी आणि दगडफेक करण्यात आली, तर भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात चोर चोर अशा घोषणा दिल्याचा आरोप आहे. हल्ल्यादरम्यान सुरक्षा रक्षकांनी हेल्मेट घालून टीएमसी नेत्याला सुखरूप बाहेर काढले.

रुग्णालयांना भाजपा नेत्यांकडून धमक्यांचे फोन

ममता बॅनर्जी यांनी आरोप केला की, डॉक्टर आणि रुग्णालयाला भाजपा नेते आणि पोलीस उपायुक्त (दक्षिण) यांच्याकडून धमक्यांचे फोन येत होते. त्यांनी सवाल केला की जर अभिषेक बॅनर्जी यांची प्रकृती गंभीर नव्हती तर त्यांना आयटीयू (ITU) मध्ये का दाखल करण्यात आले आणि नंतर दबावाखाली त्यांना डिस्चार्ज का देण्यात आला? त्या म्हणाल्या, “जर त्यांना काहीही झाले, तर ही रुग्णालये त्याला जबाबदार असतील.”

ममता बॅनर्जी यांच्या सांगण्यानुसार, अपोलो रुग्णालयाने अभिषेक बॅनर्जी यांची तपासणी केली होती आणि त्यांना घरीच विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र, या परिस्थितीमुळे त्रस्त होऊन त्यांनी पुढील उपचारासाठी अभिषेक यांना बेलव्ह्यू रुग्णालयात नेले. ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या, अभिषेक बॅनर्जी यांना आता घरी पाठवण्यात आले असून कौटुंबिक डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांचे उपचार सुरू राहतील. त्यांचे निवासस्थान आता एका रुग्णालयासारखेच कार्य करेल, जिथे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून ऑक्सिजन सिलिंडर आणि इतर वैद्यकीय उपकरणे बसवली जात आहेत.

…तर अभिषेक बॅनर्जी यांचा जागीच मृत्यू झाला असता

अभिषेक बॅनर्जी यांच्या शरीरात रक्ताच्या गाठी असल्याचा पुनरुच्चार ममता बॅनर्जी यांनी केला आणि त्यांना काहीही झाल्यास संबंधित रुग्णालयांना जबाबदार धरले जाईल, असा इशारा दिला. त्यांनी पुढे दावा केला, “हा सुरक्षेतील गंभीर त्रुटीचा प्रकार आहे. जर हेल्मेट नसते, तर अभिषेक यांचा जागीच मृत्यू झाला असता.” ममता बॅनर्जी यांनी असेही सांगितले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी फोन करून चिंता व्यक्त केली आणि मदतीचा प्रस्ताव दिला. “राहुल गांधींनी मला फोन केला आणि सांगितले की काहीही गरज भासल्यास मी त्यांना सांगू शकते; ते अभिषेक बॅनर्जी यांना उपचारासाठी हैदराबाद किंवा इतर कुठेही घेऊन जाऊ शकतात.” कपिल सिब्बल आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.

बॅनर्जी यांनी राज्यातील तपास यंत्रणांवरही टीका केली असून, सीआयडीने (CID) भ्याडपणाचे वर्तन केल्याचे म्हटले आहे. सरकारने स्वतःहून आपली भूमिका बदललेली नाही, तर सध्याच्या परिस्थितीत त्यांना तसे करण्यास भाग पाडले गेले आहे, असा दावा त्यांनी केला.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, दिल्लीतील भाजपा नेते पश्चिम बंगालमधील काही भाजप नेत्यांइतके “वाईट” नाहीत. त्यांनी घोषणा केली की तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते रविवारपासून निदर्शने सुरू करतील आणि सोमवारच्या नियोजित वेळापत्रकानुसार त्या स्वतः राणी रासमणी रोड येथे होणाऱ्या आंदोलनाचे नेतृत्व करतील, याला त्यांनी दुजोरा दिला.