टीएमसीचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी अंडी फेकत त्यांचा शर्ट फाडला आहे. तसेच यावेळी अभिषेक बॅनर्जी यांच्या दौऱ्यादरम्यान ‘चोर, चोर’ अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पश्चिम बंगालमधील सोनारपूरमध्ये ही घटना शनिवारी घडली आहे. या घटनेनंतर सोनारपूरमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमधील सोनारपूर या ठिकाणी अभिषेक बॅनर्जी हे निवडणुकीनंतरच्या हिंसाचारातील पीडितांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेले होते. मात्र, यावेळी खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाला असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान अभिषेक बॅनर्जी यांच्यावर अंडी फेकत दगडफेक करण्यात आली, तसेच त्यांचा शर्ट फाडण्यात आल्याचा आरोपही टीएमसीने केला आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.

बॅनर्जी यांच्या विरोधात घोषणाबाजी

खासदार अभिषेक बॅनर्जी हे सोनारपूर या ठिकाणी निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या घटनेतील पीडितांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी काही व्यक्तींनी खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात ‘चोर चोर’ अशी जोरदार घोषणाबाजी केली असल्याचा आरोप टीएमसीकडून करण्यात आला आहे. या घटनेमुळे तणाव वाढल्यानंतर अखेर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अभिषेक बॅनर्जी यांना संरक्षण देत आणि हॅल्मेट देत घटनास्थळावरून सुरक्षितस्थळी नेल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

अभिषेक बॅनर्जी यांनी काय म्हटलं?

सोनारपूरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, “ही घटना भारतीय जनता पक्षाने घडवून आणली आहे. हे सर्व भाजपानेच घडवलं आहे. बघा त्यांनी काय केलं? हे त्यांच्या लोकशाहीचं उदाहरण आहे. त्यांची सत्ता येऊन एक महिना देखील उलटलेला नाही, आता पोलीस कुठेच दिसत नाहीत. त्यांना मला मारायचं होतं. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आम्ही निश्चितपणे उच्च न्यायालयाला या घटनेची माहिती देऊ. आम्ही राज्यपालांनाही या घटनेची माहिती देऊ. मी न्यायालयात दाद मागणार आहे”, असं अभिषेक बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

‘तुम्ही माझा गळा कापला तरी…’

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्ष आणि ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाने राजकारण तापलेलं आहे. अनेकदा भाजपाचे कार्यकर्ते आणि टीएमसी पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचंही पाहायला मिळालं आहे. तसेच टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांना कथित बनावट स्वाक्षरी प्रकरणात सीआयडीने समन्स बजावले आहेत. या संदर्भात बोलताना खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी म्हटलं की, “तुम्ही माझा गळा कापला तरी मला घाबरवण्यासाठी तुम्हाला सात जन्म घ्यावे लागतील.”