पीटीआय, कोलकाता
पश्चिम बंगालमधील सोनारपूर येथे निवडणुकीनंतरच्या हिंसाचारातील पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेलेल्या तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांना शनिवारी स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. काही जणांनी त्यांच्यावर दगड, अंडी आणि चपला फेकल्याचा आरोप आहे. गोंधळात त्यांचा शर्ट फाटला असून त्यांना हेल्मेट घालून सुरक्षारक्षकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी ‘सत्ताधारीच मारेकरी झाले’ अशा शब्दांत सरकारवर टीका केली.
अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपने पूर्वनियोजनाने हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप करत, ‘मला ठार मारण्याचा हा प्रयत्न होता,’ असे म्हटले. दरम्यान, महिलांनी झाडू व बांबूच्या काठ्या घेऊन निदर्शने करत त्यांचा निषेध केला. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय सुरक्षा दल व पोलिसांना पाचारण करण्यात आले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सामिक भट्टाचार्य यांनी या घटनेशी पक्षाचा संबंध नसल्याचे सांगितले. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राजकीय मतभेदातून हिंसाचार करणे कधीही समर्थनीय ठरू शकत नाही, असे सांगत भाजपवर निशाणा साधला.
