भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि आधुनिक भारताचे भाग्यविधाते असे बिरुद मिरवणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १२७ वी जयंती. दलित समाजासाठी बाबासाहेबांचा जन्मदिवस हा मोठा उत्सव असला तरी बाबासाहेब हे एक मोठे राष्ट्रपुरुष असल्याने दलितेतरही त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या उत्साहाने जयंती साजरी करतात. याचे स्वरुप मोठे नसले तरी ते छुपे नाही. आपल्या समाजात बाबासाहेब जन्मले आणि त्यांनी आपल्याला जगवले याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दलित समाज त्यांच्या जयंतीदिनी अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करतो. बाबासाहेबांनी देव ही कल्पना नाकारली असली तरी देवांप्रती त्यांना माणणारे भक्तही आंबेडकरी समाजामध्ये पहायला मिळतात. म्हणूनच जयंतीदिनी बाबासाहेबांच्या सार्वजनिक ठिकाणच्या पुतळ्यांना हार घालण्यासाठी त्यांच्यासमोर मेणबत्त्या, अगरबत्या आणि धुपबत्त्या पेटवण्यासाठी मोठ्या रांगा लागलेल्या दिसतात, या दिवशी हाच मुख्य कार्यक्रम असतो अशी त्यांची धारणा असते. त्याचबरोबर ठिकठिकाणी लावलेले डॉल्बी सिस्टीम्स आणि त्यावरील गाण्यांवर नाचणारे भीमसैनिक हा ही जयंतीसाठीचा प्रमुख कार्यक्रम झालाय. हे सर्व धडाकेबाज व्हावं यासाठी समाजबांधवांकडून गोळा केलेल्या वर्गणीच्या पैशांचा अक्षरश: चुराडा होत असतो.

बाबासाहेबांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेली ठिकाणं तर या दिवशी गर्दीने फुललेली दिसतात. बाबासाहेबांना अभिवादनासाठी या गर्दीत भीमभक्त, भिमानुयायी आणि विचारवंत असा सगळ्यांचाच भरणा असतो. केवळ बाबासाहेबांप्रती श्रद्धा असल्याने अनेक कोसांवरून कसंबसं करुन आंबेडकरी समाज येथे येतो. त्यामुळे प्रचंड गर्दी होत असल्याने सहाजिकच या ठिकाणांच्या सार्वजनिक सोयीसुविधांवर ताण येतो. या ताणाचा अनेकांना त्रासही होतो. दरम्यान, या गर्दीत हाती निळा झेंडा, कपाळी निळी पट्टी किंवा गळ्यात निळं उपरणं टाकलेल्या व्यक्तींच्या जयंतीबाबतच्या प्रतिक्रिया मोठ्या उत्साही आणि भीमस्तुती करणाऱ्या असतात. तर हे सर्व फालतू असल्याचा भाव आणणारेही या गर्दीत भेटतात. अशा व्यक्ती आंबेडकर जयंतीबाबतच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना गैरसोयींबद्दल बोलण्यासच जास्त उत्सुक असतात. हे लोक मॅनरलेस, घाणेरडे असून ठिकठिकाणी कचरा-घाण करुन ठेवतात, काय त्यांची डांगडिंग, कसला हा गोंधळ-घोषणाबाजी, सरकारचे जावई असल्यासारखे वागतात, अशा सहज प्रतिक्रिया त्यांच्याकडून येतात. हे प्रातिनिधीक उदाहरण असले तरी हाच मतितार्थ इतर माध्यमांतूनही पहायला मिळतो. याचं ताजं उदाहरण म्हणजे गेल्यावर्षी ६ डिसेंबर रोजी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनी दादरच्या चैत्यभूमीवर बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी भीमसागर लोटला होता. त्यामुळे सहाजिकच परिसरात अस्वच्छता पसरली होती. अशावेळी या जत्रा-यात्रांमधील भाविकांना अथवा अनुयायांना सोयीसुविधा पुरवणे, परिसराच्या स्वच्छतेची काळजी घेणे याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची असते. मात्र, चैत्यभूमी परिसरात झालेली घाण आणि शेकडो टन कचरा महापालिकेने स्वच्छ केला, अशा आशयाच्या बातम्या या कार्यक्रमानंतर दुसऱ्याच दिवशी प्रसिद्ध झाल्या होत्या. वरवर ही परिस्थीतीचं वार्तांकन करणारी सर्वसाधारण बातमी वाटत असली तरी त्यातून आंबेडकरी जनता किती गलिच्छ आहे, हेच प्रतित होत होतं. या बातमीवर सोशल मीडियातून टीकात्मक चर्चा सुरु झाल्यानंतर वेबसाईट आणि टिव्ही माध्यमांनाही त्या बातमीच्या प्रसारणावर चाप लावावा लागला होता.

Ambedkari movement in the Bhil community Tribal woman and Dr Babasaheb Ambedkar
आदिवासी स्त्री आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Dr. Babasaheb Ambedkar and Kalaram Mandir Satyagraha
काळाराम मंदिर सत्याग्रह आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर झालेली दगडफेक, १९३० मध्ये ‘त्या’ दिवशी नेमके काय घडले होते?
prakash ambedkar
“चळवळीला लाचार करून…”, प्रकाश आंबेडकरांचा मविआला टोला; म्हणाले, “माझ्या आजोबांनी…”
mohan bhagwat dr babasaheb ambedkar marathi news
“डॉ. आंबेडकरांच्या आचरणात शोषणमुक्त समाजाचा पाया”, डॉ. मोहन भागवत यांचे मत

जयंतीदिनी, स्मृतीदिनी आंबेडकरांच्या पुतळ्यांजवळ किंवा स्मृतीस्थळांजवळ नेहमीच मोठ्या प्रमाणावर गर्दी होते, सरकार त्यांच्या अनुयायांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करुन देते, येथे पुस्तकांचे लांबलचक स्टॉल लागतात, या स्टॉल्समध्ये वैचारिक पुस्तकांचाच भरणा असतो, या स्टॉल्सच्या ग्रंथविक्रीतून कोट्यावधींची उलाढाल होते, या गर्दीत आपल्या उद्धारकर्त्याचे आभार मानण्यासाठी आपल्या पोरा-बाळांना घेऊन आलेल्या आंबेडकरी समाजातील महिलांची संख्या उल्लेखनीय असते, रस्त्याच्या दुतर्फा आंबेडकरी जनतेची स्वमालकिची किंवा भाड्याने आणलेली शेकडो वाहने दिसतात. यावरुन आंबेडकर असे कोण आहेत? लोक त्यांच्यासाठी गर्दी का करतात? असे प्रश्न अनेकांच्या मनात येतात. ही बाब केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात सर्वत्र पहायला मिळते. कारण, देशात सर्वत्र दलित समाज विखुरलेला आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या जयंतीचा उत्साह कमी अधिक प्रमाणात सर्वच राज्यांत पहायला मिळतो.

चौकाचौकात बाबासाहेबांच्या जयंतीत हारतुरे मिरवणारे, डीजेवर बेधुंद होऊन नाचणारे तरुण प्रामुख्याने गरीब आणि झोपडपट्टीवजा दलित वस्त्यांमध्ये राहणारी असतात. जेमतेम किंवा सर्वसाधारण शिक्षण घेतलेल्या तरुणांचा यात समावेश असल्याने बाबासाहेबांचा विचार डोक्यात ने घेता त्यांना डोक्यावर घेऊन ते नाचत असतात. आंबेडकरी समाजाचे हेच प्रतिबिंब असल्याचा त्यामुळे भास निर्माण होतो, हाच आंबेडकरी समाज असा समज काहीजण करुन घेतात. ही स्थिती शंभर टक्के नाकारता येण्यासारखी नसली तरी पूर्णपणे सत्य समजण्याचे कारणही नाही. कारण अशा प्रकारच्या जयंती उत्सवाला फाटा देत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवत आनंदाचा भीमजयंती महोत्सव साजरा करणारेही अनेक जण आहेत. जयंतीतील मोठ्या धांगडधिगाण्याला जाणीवपूर्वक दूर ठेवत उत्सवात पारंपारिक ढोल ताशांनाच प्राधान्य देणारे, बाबासाहेबांच्या प्रतिमेला अथवा पुतळ्याला प्रातिनिधीक स्वरुपात पुजणारे, आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची पुरेपुर काळजी घेऊन तसे उपक्रम (निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा, प्रबोधनात्मक व्याख्याने, गरीबांना गरजेच्या वस्तूंचे वाटप, अन्नदान, एकपात्री प्रयोग, भीम-बुद्ध स्तुतीपर गीतांचे सांगितीक कार्यक्रम, समाजातील गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, बौद्ध विहारांमध्ये धार्मिक कार्यक्रम, मानसिक आरोग्यासाठी विपश्यना शिबीरं) राबवणाराही एक वर्ग आंबेडकरी जनतेत आहे. हा उच्चशिक्षित वर्ग असून तो आंबेडकरी जनतेबाबतची आभासी प्रतिमा बाळगणाऱ्यांचा गैरसमज दूर करण्याचे काम करीत आहे. हा वर्ग उच्चशिक्षित असल्याने तो बाबासाहेबांची शिकवण योग्य प्रकारे अंमलात आणण्याचा कटाक्षाने प्रयत्न करताना दिसतो. बाबासाहेबांनी सांगितलेल्या ‘शिका’, ‘संघटित व्हा’ आणि ‘संघर्ष करा’ या त्रिसुत्रीचा ते आपल्या जीवनात प्रत्यक्ष अवलंब करीत असतात. उच्च शिक्षणामुळेच त्यांच्यात हा मोलाचा आणि महत्वाचा बदल झालेला दिसतो. त्यामुळे त्यांच्या मनातील आनंदाच्या भीमजयंती उत्सवाचे स्वरुपही दिवसेंदिवस वाढताना दिसत असून ही आश्वासक बाब आहे.

जगातील अनेक राष्ट्रांची संघटना असलेले ‘संयुक्त राष्ट्र संघ’, परदेशातील विद्यापीठं, तिथली जनता बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करताना दिसतात. बाबासाहेबांची १२५ वी जयंती संयुक्त राष्ट्र संघात साजरी करण्यात आली होती. यात १५६ देशांच्या प्रतिनिधींना सहभाग नोंदवला होता. राष्ट्र संघात बाबासाहेबांव्यतिरिक्त मार्टिन ल्युथर किंग आणि नेल्सन मंडेला या दोनच जागतिक नेत्यांची आत्तापर्यंत जयंती साजरी करण्यात आली आहे. यामागे बाबासाहेबांचा वैश्विक आणि मुल्याधिष्ठीत विचार कारणीभूत आहे. परदेशातील लोकांना बाबासाहेबांची वैचारिक उंची आणि महत्व माहिती आहे. जागतिक स्तरावरील महत्वाच्या तत्ववेत्यांमध्ये बाबासाहेबांचा समावेश होतो. ते जागतिक स्तरावरील मोठे अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार, समाजसेवक, राजकारणी, धोरणकर्ते होते. त्यामुळे बाबासाहेबांची जयंती साजरा करणारा, त्यांच्या विचारांनी प्रभावित झालेला, या राष्ट्रपुरुषाच्या विचारांप्रती बांधिलकी बाळगणारा, बाबासाहेब एक तत्वज्ञ आणि मानवी उन्नतीसाठी आधुनिक विचार पेरणारी व्यक्ती म्हणून जातीधर्मापलिकडे त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. हे लोकही आपण स्वतः आंबेडकर अनुयायी आहोत असे मोकळेपणाने सांगतात. खऱ्या अर्थाने या वर्गाला बाबासाहेब कळालेले आहेत. जे दुर्देवाने बहुतांश आंबेडकरी जनतेलाही कळालेले नाही. आंबेडकरी जनता ज्या पद्धतीने जयंती साजरी करते अशा स्वरुपाच्या जयंतीत या वर्गाला रस नाही. मात्र, ते सातत्याने बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करीत असतात. यासाठी सामाजिक क्षेत्रात क्रांतीकारी काम करणाऱ्या किंबहुना केलेल्या नेल्सन मंडेलांपासून ते डॉ. नरेंद्र दाभोलकरांपर्यंत अनेक देशी-परदेशी व्यक्तींची उदाहरणेही सांगता येतील.

अशा प्रकारे बाबासाहेबांना मानणारे आंबेडकरी समाजातील आंधळे भक्त, विचारी अनुयायी आणि बाबासाहेबांकडे डोळसपणे पाहणारे इतर समाजातील विचारवंत, अशी विभागणी करता येते. असे विचारवंत बाबासाहेबांच्या विचारांचा उत्सव केवळ जयंतीदिनीच नव्हे तर वर्षभर आणि प्रत्येक दिवशी साजरा करीत असतात. भीमजयंतीबाबतची अशी अनेक मतमतांतरे असली तरी चौकाचौकात दिसणाऱ्या आजच्या भीम जयंती उत्सवाचे स्वरुप हे समाजातील विविध सण उत्सवांच्या जवळपास जाणारे आहे, त्यामुळे केवळ भीम जयंतीबाबतच एकाच चष्म्यातून पाहताना नकारात्मक ओरड करणेही पटणारे नाही.

— अमित अरुण उजागरे

amit.ujagare@gmail.com