संविधानातील कलम ३७० रद्द करुन तुम्ही जम्मू-काश्मीरमधील जनतेच्या स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा करुन द्याल असे वादग्रस्त वक्तव्य नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे. लोकांची मने जिंका, मोडू नका असे आवाहन त्यांनी भाजपाला केले आहे.

भाजपाने सोमवारी निवडणूक जाहीरनामा प्रकाशित केल्यानंतर फारुख अब्दुल्ला यांनी हे विधान केले. भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात संविधानातील कलम ३७० रद्द करण्याचा पुनरुच्चार केला आहे. कलम ३७० मुळे जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा मिळतो. संविधानातील कलम ३५ अ रद्द करण्याचेही भाजपाने आश्वासन दिले आहे.

या कलमामुळे बाहेरच्या लोकांना जम्मू-काश्मीरमध्ये कुठलीही मालमत्ता खरेदी करता येत नाही. बाहेरुन लोक आणणार. तुम्ही त्यांना इथे वसवणार आणि आम्ही झोपून राहाणार?. आपण याचा सामना करायचा. ३७० तुम्ही कसे संपवणार ? अल्लाहची शपथ घेऊन सांगतो आपण यांच्यापासून स्वतंत्र व्हावे हीच अल्लाहची इच्छा असावी. तुम्ही ३७० रद्द करुन दाखवा बघू तुमचा झेंडा इथे कोण फडकवतो? अशी सरळ आव्हानाची भाषा फारुख अब्दुल्ला यांनी केली.

कलम ३७० रद्द केले तर काश्मीरमध्ये तिरंगा झेंडा फडकवायला कोणी राहणार नाही असे अब्दुल्ला म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर त्यांनी हल्लाबोल केला. जेव्हा सभेमध्ये तुम्ही बोलता तेव्हा जम्मू-काश्मीरबद्दल प्रेमाचे शब्दही बोला असे अब्दुल्ला म्हणाले. फारुख अब्दुल्ला श्रीनगरमधून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत.