Abu Dhabi Crown Prince BRICS Summit : दिल्लीत नुकतीच १८ वी ‘ब्रिक्स शिखर परिषद’ पार पडली आहे. या ब्रिक्स परिषदेत रशिया, चीन, इराण, यूएईसह आदी देशांचे प्रमुख नेते सहभागी झाले होते. याच ब्रिक्स परिषदेदरम्यान अनेक देशांमध्ये द्विपक्षीय बैठकाही झाल्या. दरम्यान, ही ब्रिक्स शिखर परिषद संपल्यानंतर पुन्हा यूएईला रवाना होत असताना अबू धाबीचे क्राउन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी दाखवलेल्या एका साधेपणाची सध्या मोठी चर्चा होत आहे.
ब्रिक्स परिषदेसाठी नवी दिल्लीत आलेले अबू धाबीचे क्राउन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्या एका कृतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये अबू धाबीच्या क्राउन प्रिन्स यांनी दाखवलेला साधेपणा आणि त्यांनी केलेल्या एका कृतीवरून त्यांचं मोठं कौतुक केलं जात आहे.
अबू धाबीच्या क्राउन प्रिन्सची का होतेय चर्चा? काय घडलं?
अबू धाबीचे क्राउन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान हे ब्रिक्स परिषदेत संपल्यानंतर दिल्लीवरून पुन्हा अबू धाबीला रवाना होण्यासाठी त्यांच्या विमानाजवळ गेले. यावेळी ते राजधानी दिल्लीवरून विमानाने अबू धाबीला निघाले होते. मात्र, रवाना होण्यापूर्वी त्यांनी आपल्या कारच्या ड्रायव्हरचे आभार मानले.
#WATCH | Delhi: Crown Prince of Abu Dhabi, Sheikh Khaled bin Mohamed bin Zayed Al Nahyan departs from India after BRICS Summit 2026. pic.twitter.com/cw3XPOlTTz
— ANI (@ANI) September 12, 2026
झालं असं की, दिल्लीवरून पुन्हा अबू धाबीला रवाना होण्यापूर्वी क्राउन प्रिन्स हे मान्यवरांची भेट घेत होते. पण निघण्याच्या घाईत त्यांनी आपल्या गाडीच्या ड्रायव्हरचे आभार मानले नाही, किंवा ते ड्रायव्हरचे आभार मानायचे विसरले असावेत. मात्र, पुढे गेल्यानंतर त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यानंतर ते पुन्हा मागे वळून आले आणि गाडीजवळ गेले . त्यानंतर त्यांनी चालकाशी हस्तांदोलन करत थोडा वेळ संवाद साधला आणि मग तिथून ते रवाना झाले. त्यांच्या या कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. युवराजांनी आपल्या ड्रायव्हरची वैयक्तिकरित्या दखल घेतल्याबद्दल त्यांच्या या एका कृतीने अनेक भारतीयांची मने जिंकली आहेत.
पेझेश्कियान अन् यूएईच्या नेत्यांची दिल्लीत भेट
ब्रिक्स नेत्यांच्या परिषदेदरम्यान इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान आणि अबू धाबीचे क्राउन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट झाली. यावेळी फक्त भेट झाली नसून दोन्ही नेत्यांमध्ये मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीत राजनैतिक संवाद कायम राखण्याच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर महत्वाची चर्चा देखील झाली.
गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि इराण युद्ध सुरू आहे. त्यामुळे पश्चिम आशियात तणाव निर्माण झालेला आहे. या दरम्यान इराण आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये देखील काही मतभेदांमुळे तणाव निर्माण झालेला आहे. असं असताना नवी दिल्लीत ब्रिक्स परिषदेदरम्यान मसूद पेझेश्कियान आणि अबू धाबीचे क्राउन प्रिन्स यांची भेट झाल्यामुळे ही एक मोठी घडामोड मानली जात आहे.
