उत्तर प्रदेशमध्ये पंचायत पातळीवरील निवडणुकांमध्ये पंचायत प्रमुखपदासाठी अर्ज भरताना महिलांशी गैरवर्तन करण्यात आले असून हिंसाचारही करण्यात आला आहे. त्यामुळे हिंसाचाराचे नामकरण ‘मास्टरस्ट्रोक’ असेच करावे लागेल, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी केली आहे.

काँग्रेसच्या सरचिटणीस  प्रियंका गांधी वड्रा यांनी भाजपवर सर्व मर्यादा ओलांडल्याचा आरोप केला असून महिलांना निवडणूक अर्ज भरण्यापासून वंचित ठेवले आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांनी हिंदीत केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे,की काही वर्षांपूर्वी एका बलात्कारित महिलेने भाजप आमदाराविरोधात आवाज उठवला होता, तेव्हा तिला ठार मारण्याचे प्रयत्न केले होते. आज भाजपने महिलांना उमेदवारी अर्ज भरण्यापासून वंचित करून सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. सरकारही तेच आहे, वर्तनही तेच आहे. यात सदर महिलेला अर्ज दाखल करण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे.

लखीमपूर खेरी येथे झालेल्या आणखी एका घटनेत समाजवादी पक्षाच्या उमेदवारास भाजप नेत्यांनी धक्काबुक्की केली असून प्रशासनाने दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत. एका गट सदस्य महिला सदस्याची साडी पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ओढण्यात आली, असा आरोपही काँग्रेसने केला असून राज्य सरकारने  माफी मागावी असे म्हटले आहे.