उत्तराखंड दुर्घटनेतील १७० जणांचा शोध सुरूच

हिमकडा कोसळल्यानेच प्रलय; वैज्ञानिकांचा प्राथमिक निष्कर्ष

(संग्रहित छायाचित्र)

 

उत्तराखंडमध्ये घडलेली दुर्घटना ही हिमनदीचा कडा कोसळल्याने झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष ‘वाडिया इन्स्टिटय़ूट ऑफ हिमालयन जिऑलॉजी’ या संस्थेच्या वैज्ञानिकांनी काढला आहे.

उत्तराखंडमध्ये रविवारी हिमकडा कोसळून अचानक पूर आला होता. त्यात काही लोकांनी प्राण गमावले, तर काहींचा शोध अजून सुरू आहे.

‘वाडिया इन्स्टिटय़ूट ऑफ हिमालयन इकॉलॉजी’ या संस्थेचे संचालक कलाचंद जैन यांनी सांगितले, की रौंथी हिमनदीच्या जवळ असलेल्या एका हिमनदीचा कडा कोसळून पूर आला. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून ६०६३ मीटर उंचीवर आहे. रौंथी हिमनदी ही रौंथी व मृगधनी येथून सुरू होते. ज्या खडकांच्या आधाराने मोठय़ा प्रमाणात हिमाचा थर बराच काळ साठला होता, ते खडक कमकुवत झाले होते. हळूहळू हा हिमाचा थरही ढिला होत गेला. त्यातून खडकांमध्ये कमकुवत क्षेत्र निर्माण होऊन सगळा हिमनदीसदृश हिमकडाच कोसळला व त्यामुळे दुर्घटना कालावधीत एका छोटय़ा धरणाइतके पाणी वाहत आले. पाच भूगर्भशास्त्रज्ञांचे दोन चमू दुर्घटनेचा अभ्यास करीत असून

त्यांनी या भागाची हेलिकॉप्टरमधून पाहणी केली. दरम्यान, उत्तराखंडमध्ये आणखी सहा मृतदेह सापडल्याने मृतांची संख्या ३२ वर गेली आहे. अनेक संस्था तेथे मदतकार्य करीत असून १७० लोक बेपत्ता आहेत. मदतकार्यात एकूण ६०० जण सहभागी आहेत.

शोधकार्यासाठी ड्रोनचा वापर

उत्तराखंड येथील दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येत असून अजून चिखलाने भरलेल्या बोगद्यात २५-३५ जण अडकून पडले आहेत.  अनेक संस्था एनटीपीसीच्या जलविद्युत प्रकल्पाच्या ठिकाणी मदतकार्य करीत आहेत. आतापर्यंत विविध ठिकाणी ३२ मृतदेह सापडले आहेत. उत्तराखंडचे पोलीस उपमहानिरीक्षक नीलेश आनंद भरणे यांनी सांगितले, की बोगद्यात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. ढिगाऱ्याच्या आतला भाग कठीण बनत चालल्याने अडकलेल्यांना बाहेर काढण्यात अडथळे निर्माण होत आहेत. रैणी, पल्ली, पांग, लता सुराईथोटा, सुकी, भालगाव, तोलमा, फगरासू, लोंग सेगडी, गहर, भांगयुल, जुवागवाद, जुगजू या गावांचा संपर्क तुटला आहे. मलारी येथील पूल यात वाहून गेल्यामुळे २५०० लोकांचा संपर्क तुटला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Accident in uttarakhand due to avalanche abn

ताज्या बातम्या