पीटीआय, पालक्काड : केरळच्या पालक्काड जिल्ह्यात गेल्या महिन्यात झालेल्या रा.स्व. संघाच्या एका नेत्याच्या हत्येच्या संबंधात आणखी चार जणांना अटक करण्यात आल्यामुळे, या प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची एकूण संख्या २० वर गेली आहे.  मंगळवारी सायंकाळी ज्या चौघांना अटक करण्यात आली, त्यापैकी एक जण १६ एप्रिल रोजी संघाचे पदाधिकारी एस. के. श्रीनिवासन (४५) यांची हत्या करणाऱ्या सहा जणांच्या गटाचा भाग होता. या हल्लेखोर गटातील दोघे जण अद्याप फरार आहेत, असे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) विजय साखरे यांनी सांगितले.

 या प्रकरणी अटक करण्यात आलेले सर्व वीसही जण पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेचे किंवा तिची राजकीय आघाडी सोशल डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे (एसडीपीआय) एकतर कार्यकर्ते आहेत, किंवा त्यांच्याशी संबंधित आहेत, असेही साखरे म्हणाले. पीएफआयचा नेता सुबैर याच्या १५ एप्रिलला झालेल्या हत्येचा बदला म्हणून श्रीनिवासन यांना मारण्यात आले, असे पोलिसांचे म्हणणे आहे.