गुजरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच रंगात आली आहे. मात्र यावेळी निवडणुकीच्या िरगणात चक्क  गंभीर गुन्ह्य़ांतील आरोपी गुंड टोळ्या आणि भाई मंडळींनी आपली ताकद पणाला लावली असून भावनगरसह महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदर आणि इतर मतदार संघांमधून ही मंडळी राजकीय ताकद अजमावित आहेत.
गॉडमदर म्हणून प्रसिद्ध असलेल्या दिवंगत सांतोकबेन जाडेजा यांचे पोरबंदर मतदारसंघावर वर्चस्व होते; तर भावनगरच्या ग्रामीण मतदार संघातून नशीब अजमावणारे मत्स्य व्यवसाय राज्यमंत्री पुरुषोत्तम सोळंकी यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप करण्यात येतो. कोळी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे सोळंकी हे १९९३च्या मुंबई जातीय दंगलीतील आरोपी असून त्यांचे समर्थक त्यांना भाई म्हणूनच संबोधतात. सध्या मत्स्य व्यवसाय खात्यातील ४०० कोटी रुपये घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
पोरबंदर जिल्ह्य़ात राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी दोन टोळ्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. ऑक्टोबर २०१२च्या सुमारास एका स्थानिक वर्तमानपत्रातील जाहिरातीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. खंडणीसाठी तुम्हाला कोणी फोन केला तर माझ्याशी संपर्क साधा, अशा आशयाची ही जाहिरात सांतोकबेन जाडेजा यांचा मुलगा कंधाल जाडेजा याने केली होती. सध्या कंधाल हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर पोरबंदरमधील कुटियाना मतदारसंघातून उभा आहे. कंधालच्या विरोधात रिंगणात उतरले आहेत करसनभाई दुलाभाई ओडेदारा. करसनभाई यांचा भाऊ आणि कुख्यात गुंड भीमा दुला ओडेदारा हा गुजरात काँग्रेस अध्यक्ष अर्जुन मोधवाडिया यांचा सहकारी मुलु मोधवाडिया यांच्या हत्येप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
याशिवाय राजकोट जिल्ह्य़ातील गोंडाळ मतदारसंघातही गुंड टोळ्यांचे वर्चस्वाचे राजकारण कित्येक वर्षांपासून सुरू आहे. या मतदारसंघातून भाजपने खुनाचा आरोप असलेल्या जयराज सिंग जाडेजा यांना रिंगणात उतरवले आहे. सन २००७ मध्ये जाडेजा राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंदू वाघासिया यांच्याकडून अतिशय कमी मतांच्या फरकाने हरले होते.
वाघासिया यांनाही नुकतीच एका प्रकरणात अटक झाली होती. याच मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांच्या नव्या गुजरात परिवर्तन पक्षाचे उमेदवार माजी राज्यमंत्री गोर्धन जदाफिया रिंगणात आहेत. गोंडाळ मतदारसंघात पटेल आणि क्षत्रियांचे प्राबल्य आहे. या मतदारसंघालाही िहसाचाराचा इतिहास आहे.