हिमाचल प्रदेशात बेकायदा बांधकामाविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या सरकारी महिला अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या करुन फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. मथुरा येथून आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ५१ वर्षीय सहाय्यक नगर नियोजक शैला बाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बेकायदा बांधकामाविरोधात कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी यांची हॉटेल व्यवसायिक विजय ठाकूर याने पाठलाग करत गोळी घालून शैला बाला यांची हत्या केली होती.

हत्येचा तपास करण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधिक्षक शिव कुमार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. आरोपी पोलिसांच्या रडारवर होता. मथुरामधून त्याला अटक करण्यात आली असून चौकशीसाठी सोलानला आणलं जात आहे. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे अशी माहिती शिव कुमार यांनी दिली आहे.

पोलीस महासंचालकांनी आरोपीला अटक करण्यात आल्याने पोलिसांच्या कामकाजावर समाधान व्यक्त केलं आहे. पोलिसांनी राज्याबाहेर जात आरोपीचा शोध घेतल्याने त्यांनी पथकाचं कौतुक केलं आहे. दरम्यान डीजीपी बेकायदा बांधकामाविरोधातील मोहिमेची पाहणी करत आहेत. याआधी आरोपीने पोलिसांना आपण आत्मसर्पण करणार असल्याचा मेसेज पाठवला होता.