scorecardresearch

बिहारमध्ये विषारी दारूच्या बळींची संख्या ४० वर; राज्य सरकारवर कारवाई करण्याची विरोधकांची मागणी

बिहारमध्ये विषारी दारू प्राशन केल्याने बिहारमध्ये ४० जणांचा मृत्यू झाल्याने या प्रकरणी केंद्र सरकारने बिहार सरकारवर कारवाई करावी, अशी मागणी लोकसभेतील भाजप खासदारांनी गुरुवारी केली.

बिहारमध्ये विषारी दारूच्या बळींची संख्या ४० वर; राज्य सरकारवर कारवाई करण्याची विरोधकांची मागणी
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पीटीआय, नवी दिल्ली : बिहारमध्ये विषारी दारू प्राशन केल्याने बिहारमध्ये ४० जणांचा मृत्यू झाल्याने या प्रकरणी केंद्र सरकारने बिहार सरकारवर कारवाई करावी, अशी मागणी लोकसभेतील भाजप खासदारांनी गुरुवारी केली. या घटनेला मुख्यमंत्री नितीश कुमार जबाबदार असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

लोकसभेत शून्य तासाला पश्चिम चंपारणचे खासदार संजय जैस्वाल यांनी हा मुद्दा उपस्थित केला. बिहारमध्ये बंदी असतानाही पोलीस अधिकाऱ्यांच्या संरक्षणात बनावट दारूची विक्री केली जाते. मात्र मुख्यमंत्री कोणावरही कारवाई करत नाही, असे जैस्वाल म्हणाले. ‘‘ही बिहार सरकार पुरस्कृत ४० लोकांची हत्या आहे. राज्यात बंदी असतानाही पोलिसांच्या मदतीने आणि संरक्षणासह पोलिसांकडून प्रत्येक घराघरात बनावट दारूचा पुरवठा केला जातो,’’ असा आरोप जैस्वाल यांनी केला. औरंगाबादचे भाजप खासदार सुशील कुमार सिंह यांनी या दुर्घटनेतील मृत्यूंना ‘सामुहिक हत्या’ असे संबोधले आणि त्यासाठी बिहार सरकारला जबाबदार धरले.

‘‘विषारी दारूच्या आतापर्यंत १५ हून अधिक घटना घडल्या आहेत. पण मुख्यमंत्री म्हणतात की दारू पिणारे मरतील किंवा तुरुंगात जातील, आणि विषारी दारू विकणारे त्यांच्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्या पक्षाचे उमेदवार होतील, असा आरोप जैस्वाल यांनी केला. मुख्यमंत्री विधानसभेत ज्या पद्धतीने या मुद्दय़ावर बोलतात, त्यावरून त्यांचे मानसिक संतुलन ढासळल्याचे दिसते, असेही जैस्वाल म्हणाले.

‘‘मी केंद्र सरकारला (प्रचलित) कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीकडे लक्ष देण्याची विनंती करतो आणि ३७ लोकांच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या बिहारच्या महागठबंधन सरकारवर त्वरित कारवाई करावी,’’ अशी मागणी त्यांनी केली. बनावट दारूच्या विक्रीत सहभागी असलेल्या आणि त्यातून कोटय़वधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही जयस्वाल यांनी केली.

जो पियेगा, वो मरेगा!; नितीश कुमार यांचे वक्तव्याने वाद

पाटना : बिहारमधील विषारी दारूप्रकरणातील बळींची संख्या ४० झाली असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गुरुवारी इशारा दिला की जे लोक बनावट दारू पितात, त्यांचा मृत्यू होणारच. (जो पियेगा, वो मरेगा!) मात्र नितीश कुमार यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. नितीश कुमार मात्र आपल्या भूमिकेवर ठाक असून ही माझी वैयक्तिक इच्छा नसून राज्यातील महिलांच्या आक्रोशाल प्रतिसाद आहे, असे सांगितले. संसदेतही हा मुद्दा उपस्थित करणाऱ्या भाजप खासदारांवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र भाजपसह अन्य पक्षांनी नितीश कुमार यांच्या दारू धोरणावर जोरदार टीका केली. विरोधी पक्षांनी सलग दुसऱ्या दिवशी विधानसभेत गोंधळ घातला. तर बिहारमधील महाआघाडी सरकारला पाठिंबा देणाऱ्या सीपीआय (एमएल) लिबरेशनने पुनरावलोकनाची मागणी करत कामकाज सुरू होण्यापूर्वी सभागृहाबाहेर निदर्शने केली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या