देशातील करोनास्थिती बऱ्याच अंशी दिलासादायक आहे. केरळ वगळता संपूर्ण देशात नियंत्रणात आलेल्या करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांतील सर्वात कमी सक्रिय (अ‍ॅक्टिव्ह) करोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत प्रथमच आता देशातील करोनाच्या सक्रिय प्रकरणांची संख्या ३ लाखांच्या खाली आली आहे. तर दुसरीकडे केरळ राज्याची चिंता कायम असून तिथे दररोज १५ हजारांहून अधिक करोना रुग्णांची नोंद होत आहे. हळूहळू राज्यातील रुग्णसंख्येत घट देखील होत आहे. गेल्या दोन आठवड्यांत राज्यातील सक्रिय प्रकरणे २ लाखांवरून १.६३ लाखांवर आली आहेत. तरीही देशातील सर्व सक्रिय प्रकरणांमध्ये केरळचा वाटा सुमारे ५५ टक्के आहे.

इतकंच नव्हे तर सध्या ज्या राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वात जास्त चिंता आहे ते राज्य केरळ नव्हे तर मिझोराम आहे. केरळ आणि महाराष्ट्र या मोठ्या राज्यांसह, ईशान्येकडील या लहानशा राज्यात देखील गेल्या काही आठवड्यांपासून करोना रुग्णांची संख्या जास्त आहे. फक्त १२ लाख लोकसंख्या असलेल्या मिझोराम या राज्यात गेल्या २० दिवसांत जवळजवळ २४ हजार नव्या करोना प्रकरणांची नोंद झाली आहे. जवळजवळ करोनाच्या १६ हजार सक्रिय प्रकरणांसह केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडूनंतर आता मिझोराम हे देशातील सध्या चौथ्या क्रमांकाचं राज्य आहे.

महाराष्ट्रासह ‘या’ ५ राज्यांची चिंता कायम

दिलासादायक बाब अशी की, देशाच्या इतर भागांमध्ये मात्र करोना प्रकरणांच्या संसर्गामध्ये सातत्याने घट सुरू आहे. २० पेक्षा जास्त राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आता दररोज १०० पेक्षा देखील कमी नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर त्यापैकी सुमारे १० ठिकाणी दररोज १० पेक्षाही कमी प्रकरणांची नोंद होत आहे. फक्त केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये सध्या दररोज १ हजारहून अधिक प्रकरणांची नोंद होत आहे.

बिहार, राजस्थान, झारखंड आणि तीन केंद्रशासित प्रदेश – अंदमान आणि निकोबार बेटे, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव, आणि चंदीगडमध्ये करोनाच्या सक्रिय प्रकरणांची संख्या १०० च्या खाली आली आहे.

५० दिवसांत ४ लाखांवरून ३ लाखांवर

दरम्यान, देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या सक्रिय रुग्णांची संख्या ३७.४५ लाखांपर्यंत पोहोचल्यानंतर मे महिन्याच्या मध्यापासून ही पुन्हा ही संख्या सातत्याने कमी झाली आहे. केरळमध्ये अचानक वाढलेल्या संसर्गाच्या हा काही काळ वगळता गेल्या काही आठवड्यांमध्ये करोना संसर्गाच्या प्रमाणात कमालीची घसरण सुरु आहे. त्यामुळे, गेल्या ५० दिवसांत देशातील अ‍ॅक्टिव्ह केसची संख्या ४ लाखांवरून ३ लाखांवर आली आहे.