१९९३च्या बॉम्बस्फोटप्रकरणात अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी तुरूंगात असणाऱ्या अभिनेता संजय दत्तच्या शिक्षेचा कालावधी कमी करण्यास सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी विरोध दर्शविला आहे. त्यांनी गुरूवारी पत्र पाठवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आपली भूमिका मांडली. संजय दत्तला तुरूंगातून लवकर सोडल्यास चुकीचा पायंडा पडेल, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. संजय दत्त सध्या पुण्याच्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. मात्र, तुरूंगात असताना चांगल्या वागणुकीबद्दल त्याच्या शिक्षेचा कालावधी तीन ते साडेतीन महिन्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाला राज्य सरकारकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही. याच पार्श्वभूमीवर भालेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून संजय दत्तच्या सुटकेला विरोध दर्शविला आहे. संजय दत्तबाबत सरकारने कोणताही दयाभाव दाखवू नये. अन्यथा हाय प्रोफाईल गुन्हेगारांच्याबाबतीत चुकीचा पायंडा पडेल आणि अन्य गुन्हेगारही अशाच प्रकारच्या वागणुकीची अपेक्षा करतील, असे भालेकर यांनी पत्रात म्हटले आहे.