Sudesh Berry Controversial Statements on CJP: कॉक्रोच जनता पार्टीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देण्यास भाग पाडल्यानंतर आता त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. कॉक्रोच जनता पार्टीने आपले आंदोलन मागे घेतल्यानंतर या आंदोलनात वापरली गेलेली भाषा, आंदोलनात सहभागी झालेले विद्यार्थी, इतर लोक यांच्यावर भाजपाच्या समर्थकांकडून टीका होत आहे. खासदार कंगना रणौत यांनी जेन झींना जनरेशन गटर म्हटले होते. त्यानंतर आता अभिनेता सुदेश बेरीचेही कॉक्रोच जनता पार्टीबद्दलचे विधान वादात येण्याची शक्यता आहे.

सुदेश बेरी यांनी नुकतीच अकंपनी अक्की या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी कॉक्रोच जनता पार्टीवर वादग्रस्त टीका केली. तसेच त्यांनी पंतप्रधान मोदी, केंद्र सरकार यांचे तोंडभरून कौतुक केले. “पंतप्रधान मोदी हे विष्णूचे अवतार आहेत. मला संधी मिळाली तर मी त्यांचे पाय धुवून ते पाणी प्राशन करेन”, असेही विधान त्यांनी केले.

जंतर-मंतरवर बसलेले लोक भिकारी

जंतर-मंतरवरील आंदोलनाबाबत बोलताना सुदेश बेरी म्हणाले की, तिथे जे आंदोलनाला बसले आहेत, ते सर्व भिकारी लोक आहेत. मला नाही माहीत ते एजीपी, सीजीपी कोण आहेत. जंतर-मंतरवरील लोक विकले गेलेले आहेत. त्यांना लकवा मारलेला आहे. मला त्यांच्याबद्दल फारसे माहीत नाही. पण ते लोक देशाला मागे नेत आहेत.

सुदेश बेरी पुढे म्हणाले, “हे लोक लहान मुलांसाठी उद्यान बनवू शकतात का, वृद्धांसाठी वृद्धाश्रम बनवू शकतात का? हे सगळे लोक बिनकामाचे आहेत. कुणीतरी उद्योजक यांना पैसे पुरवतो म्हणून फाटके लोक इथे येऊन आंदोलनाला बसले. स्टेजवर उभे राहून माईकवर काहीही बोलत आहेत. कुणी नाचतंय तर कुणी काय करतंय. प्राण्याचं नाव घेऊन यांनी पक्ष बनवला. त्यांनी दुसरा एखादा प्राणी का नाही निवडला. हाच प्राणी का?”

पंतप्रधान मोदींनी संपूर्ण जगात चहा विकला

सुदेश बेरी यांनी पंजाबी भाषेत या आंदोलकांना शिवीगाळही केली. ते पुढे म्हणाले, “जंतर-मंतरवरील आंदोलकांनी दोन-चार पुस्तके काय वाचली, ते आम्हाला शिकवायला लागले. यांचा एकच उद्देश होता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव्या घालणे. मोदींनी तुमचे काय वाईट केले? त्यांनी पूर्ण जगात चहा विकला. पुढे ते कस्तुरी विकायला गेले तर काय करतील जगाचे…”

“पंतप्रधान मोदी असे, मोदी तसे… या नव्या पिढीला वाटते की, आम्ही पंतप्रधान मोदींना शिव्या घालून लाईक्स, फॉलोअर्स वाढवू आणि घरी आरामात बसून पैसे कमवू शकतो”, असे सांगून त्यांनी आंदोलकांवर टीका केली.

सोनम वांगचूक यांच्याबद्दल विचारले असता सुदेश बेरी म्हणाले, मला त्यांच्याबद्दल काहीही माहीत नाही. मी ३० वर्षांपासून बातम्या पाहिलेल्या नाहीत. मला हेही माहीत नाही की, इस्रायलने इराणवर किती क्षेपणास्त्र डागले.

पंतप्रधान मोदी विष्णूचे अवतार

“मला पंतप्रधान मोदींचे पाय धुवून ते पाणी प्राशन करायचे आहे. माझी जर त्यांच्याशी भेट घालून दिली तर मी हे करायला तयार आहे. मी त्यांना व्यक्तीशः ओळखत नाही. मी अजून त्यांना प्रत्यक्ष भेटलो नाही. जसे आपण देवाला कधी भेटलो नाही, तरीही त्याची पूजा करतो. त्याप्रमाणेच मी पंतप्रधान मोदींचा आदर करतो. यात मला काहीच वाईट नाही”, असे उद्गार सुदेश बेरी यांनी काढले.