लेखक – प्रणीत पवार: तमिळनाडूचे राजकारण गेल्या काही दशकांपासून द्रमुक आणि अण्णा द्रमुक याच प्रादेशिक पक्षांभोवती फिरत आले आहे. यंदा २०२६च्या विधानसभा निवडणूक रिंगणात प्रसिद्ध अभिनेता विजयच्या ‘तमीळगा वेत्री कळघम’ पक्षाने उडी घेतल्याने तिरंगी सामना होईल. विजय यांचा पक्ष तरुण मतदारांना आणि तमीळनाडूतील पारंपरिक राजकारणास कंटाळलेल्या वर्गाला आकर्षित करत असल्याने त्यांच्या पक्षाच्या कामगिरीवर निकाल निश्चित होईल. त्यांचा पक्ष ‘द्रमुक’ की ‘अण्णा द्रमुक’ची मते घेणार, याची उत्सुकता आहे.

तमिळनाडूमध्ये २३४ जागांसाठी गुरुवार, २३ एप्रिल रोजी निवडणूक होत आहे. मंगळवारी (२१ एप्रिल) येथील प्रचाराची सांगता झाली. येथे एकूण ५ कोटी ६० लाख मतदार आहेत. तमीळनाडूत ‘द्रमुक’प्रणीत ‘धर्मनिरपेक्ष पुरोगामी आघाडी’मध्ये काँग्रेस, डावे पक्ष आणि विदुथलाई चिरुथाईगल कात्ची (व्हीसीके) यांचा समावेश आहे. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली ही आघाडी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर एडप्पाडी के. पलानीसामी यांच्या नेतृत्वाखाली ‘अण्णा द्रमुक’, भाजप आणि पट्टाली मक्कळ कच्ची (पीएमके) यासारखे पक्ष ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’तून निवडणूक लढवत आहेत.

अस्मितेचा मुद्दा

‘द्रमुक’च्या निवडणूक प्रचारात केंद्र सरकारकडून महसूल वाटपातील भेदभाव आणि तमीळ संस्कृतीचे रक्षण, ‘द्रविडी प्रारुप’ यासारखे मुद्दे अग्रभागी होते. तसेच मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी महिलांसाठीच्या मोफत बस सेवा, ‘कलैग्नार मगलिर उरिमाई’ (महिलांना १००० रुपये मदत) योजना आणि आरोग्य-शिक्षणावरील गुंतवणुकीच्या बळावर पुन्हा सत्ता मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला.

मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे सरकार आणि राज्यपाल आर. एन. रवी यांच्यातील वाद हा सर्वात मोठा मुद्दा ठरला. विधेयकांवर निर्णय घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या कालमर्यादेमुळे सरकारला काहीसा दिलासा मिळाला असला, तरी या संघर्षातून निर्माण झालेली ‘राज्य विरुद्ध केंद्र’ ही भावना राजकीयदृष्ट्या ‘द्रमुक’च्या फायद्याची ठरू शकते. दुसरीकडे ‘अण्णा द्रमुक’, भाजप आणि सहयोगी पक्षांनी भ्रष्टाचाराचे आरोप आणि घराणेशाही (उदयनिधी स्टॅलिन यांची बढती), वाढती महागाई, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आणि महिलांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून सत्ताधारी ‘द्रमुक’ला लक्ष्य केले. ‘

‘टीव्हीके’मुळे पारंपरिक मतांचे विभाजन?

  • अभिनेता विजयने आपल्या ‘टीव्हीके’ पक्षाद्वारे निवडणूक रिंगणात प्रवेश केला. त्यांनी भाजपला वैचारिक शत्रू आणि ‘द्रमुक’ला राजकीय शत्रू घोषित करून, स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
  • ‘टीव्हीके’ने प्रचारात प्रामुख्याने नवमतदार आणि पारंपरिक द्रविडी पक्षांपासून दुरावलेल्या मतदारांना साद घातल्याचे दिसून आले.
  • विजय यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे पारंपरिक मतांचे विभाजन होऊन विशेषतः ‘अण्णा द्रमुक’च्या मतपेढीला फटका बसण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर काही शहरी भागांत ‘द्रमुक’च्या मतांमध्येही विभागणी होऊ शकते, ज्यामुळे त्रिशंकू विधानसभेची शक्यताही वर्तवली जात आहे.

भाजपकडून प्रतिमा बदलाचा प्रयत्न

उत्तर भारतीय पक्ष अशी प्रतिमा असल्याने भाजपसाठी तमिळनाडू हे राज्य नेहमीच आव्हानात्मक ठरले. यंदाच्या निवडणुकीत भाजपचे राज्यात जनाधार वाढवण्यावर भर दिला. ‘द्रविडी अस्मिते’च्या राजकारणाला भाजपने हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व या मुद्द्यांनी आव्हान देण्याचा प्रयत्न केला.

विधेयकाची प्रत जाळल्याचा लाभ?

मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी १६ एप्रिल २०२६ रोजी मतदारसंघ फेररचना विधेयकाची प्रत जाळली आणि राज्यभर काळे झेंडे लावून तीव्र निषेध व्यक्त केला. या कृतीमुळे तमीळनाडूच्या राजकीय हक्कांचे रक्षण करणारा पक्ष म्हणून ‘द्रमुक’ची प्रतिमा अधिक प्रबळ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तेलंगणा, केरळ आणि कर्नाटक यांसारख्या इतर दाक्षिणात्य राज्यांतील नेत्यांनीही मतदार फेररचनेला विरोध दर्शविल्याने, स्टॅलिन दक्षिणेतील एक प्रमुख नेतृत्व म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे.