Actor Vijay Tamil Nadu Politics Kingmaker Prediction: तामिळनाडूमध्ये येत्या २३ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात राज्यभर विधानसभेसाठी मतदान होणार असून ४ मे रोजी आसाम, पुदुच्चेरी, केरळ व पश्चिम बंगाल या राज्यांसमवेत मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे. तामिळनाडूमध्ये द्रमुक हातातील सत्ता कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असून दुसरीकडे जयललितांचा अण्णाद्रमुक पक्ष पुन्हा सत्तेवर स्वार होण्यासाठी कंबर कसून मैदानात उतरला आहे. या दोन्ही पक्षांच्या संघर्षामध्ये तामिळनाडूत तिसरा भिडू म्हणून सुप्रसिद्ध अभिनेता जोसेफ विजय चंद्रशेखरनं दंड थोपटले आहेत.
तामिळनाडूचं आजपर्यंतचं राजकारण द्रमुक व अण्णाद्रमुक या दोन पक्षांभोवतीच फिरत असताना विजयनं आपल्या तमिलगा वेत्री कळघम अर्थात TVK पक्षाच्या माध्यमातून या दोन्ही पक्षांना थेट आव्हान दिलं आहे. आपण कोणत्याही आघाडीत जाणार नसून स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असं जाहीर करतानाच विजयनं तामिळनाडूचं मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करण्याचीही अप्रत्यक्षपणे तयारी दर्शवली असताना त्याचे ग्रहदेखील तसंच काहीसं भाष्य करताना दिसत आहेत. ज्योतिषतज्ज्ञ विक्रम चंदीरामानी यांनी विजयच्या कुंडलीचा अभ्यास करून तामिळनाडूच्या राजकारणातील त्याच्या भवितव्याबाबत मोठं भाकित वर्तवलं आहे.
तामिळनाडूत त्रिशंकू निकालांची शक्यता!
विक्रम चंदीरामानी यांनी आपल्या भाकितामध्ये तामिळनाडूत यंदाच्या निवडणुकीत त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. आणि अशा परिस्थितीत तिसरा खेळाडू म्हणून विजयची भूमिका ‘किंगमेकर’ची ठरेल, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. “तामिळनाडूतील सध्याची स्थिती पाहाता विजय यांचा पक्ष निकालांच्या केंद्रस्थानी असू शकतो. त्यामुळेच त्यांची स्वत:ची भूमिका निकालांचं चित्र निश्चित करण्यात महत्त्वाची ठरू शकते”, असं विक्रम चंदीरामानी यांनी नमूद केलं आहे.
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार?
दरम्यान, विजयच्या ग्रहांचा विचार करता तो आगामी काळात तामिळनाडूचा मुख्यमंत्री होऊ शकतो, असं भाकित विक्रम चंदीरामानी यांनी वर्तवलं आहे. “ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर विजय तामिळनाडूतील आगामी आघाडी सरकारचे मुख्यमंत्री होऊ शकतात. त्रिशंकू अवस्थेमध्ये त्यांचा पक्ष सत्तेत केंद्रस्थानी असेल. त्यांच्या कुंडलीमध्ये ग्रहांच्या सध्याच्या स्थितीनुसार त्यांची येत्या काळात मोठी प्रगती होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आत्ता विजय कोणते निर्णय घेतात आणि कुणाशी आघाडी करतात या गोष्टी त्यांच्या राजकीय भवितव्याला कलाटणी देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील”,असं भाकित विक्रम चंदीरामानी यांनी वर्तवलं आहे.
अभिनेता विजयच्या कुंडलीत काय?
विक्रम चंदीरामानी यांनी विजयच्या कुंडलीच्या केलेल्या विश्लेषणानुसार, “विजयची कुंडली इतरांशी भावनिक नाती आणि धोरणात्मक जोखीम या दोन्हींचं मिश्रण आहे. कर्क लग्न आणि कर्क राशीत चंद्र व मंगळ दोन्ही असल्यामुळे जनतेशी त्यांचं एक प्रकारचं मजबूत नातं निर्माण होऊ शकतं. अशा प्रकारची ग्रहदशा फक्त व्यवस्थेकडून मिळणाऱ्या संधीमुळे नव्हे, तर प्रत्यक्ष जनतेशी असलेल्या नात्यामुळे मोठ्या होणाऱ्या नेत्यांना जन्म देते”, असंही विश्लेषण विक्रम चंदीरामानी यांनी केलं आहे.
“विजयच्या जन्मकुंडलीत मिथुन राशीत सूर्य आणि बुध परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता, संचार कौशल्य आणि अनेक विचारसरणींशीही जोडले जाण्याची त्यांच्यात क्षमता असल्याचं दर्शवतात. वृषभ राशीत शुक्र त्यांचा सार्वजनिक जीवनात प्रभावी वावर दर्शवतो. राहुचा प्रभाव, विशेषत: बृहस्पतिसोबत त्याचं नातं यामुळे महत्त्वाच्या क्षणी साहसपूर्ण निर्णय घेण्याची क्षमता दिसून येते”, अशा शब्दांत विक्रम चंदीरामानी यांनी अभिनेता विजयच्या राजकीय भवितव्याबाबत अंदाज वर्तवला आहे.
