Veerappan Interview Sukanya Sun TV Controversy : गेल्या ३० वर्षापासून चेन्नईच्या न्यायालयापासून सूरू असलेल्या एका मोठ्या कायदेशीर लढाईत प्रसिध्द दाक्षिणात्य अभिनेत्री आर. सुकन्या यांना अखेर मद्रास उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कुप्रसिध्द चंदन तस्कर वीरप्पनने १९९६ मध्ये सुकन्या यांच्यावर केलेल्या बदनामीकारक आरोपांविषयी न्यायालयाने सन टीव्ही नेटवर्कला १० लाख रुपयांची नुकसान भरपाई देणाचा आदेश दिले आहेत. २०१५ मध्ये कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती के. कुमारेश बाबू यांनी कायम ठेवला आहे. याबाबतचे वृत्त ‘द प्रिंट’ या वृत्तसंस्थेने प्रसिध्द केले आहे.
काय होते नेमके प्रकरण?
एप्रिल १९९६ मध्ये सन टीव्हीने चंदन तस्कर वीरप्पनची एक मुलाखत प्रसारित केली होती. या मुलाखतीत वीरप्पनने दावा केला होता की, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री सुकन्या यांचे तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या मुलासोबत संबंध होते.
हा खोटा आरोप सुकन्या यांच्यासाठी अत्यंत धक्कादायक होता. या मुलाखतीमुळे त्यांच्या प्रतिमेला आणि प्रतिष्ठेला मित्र, कुटुंब आणि समाजात मोठी ठेच पोहोचली. सन टीव्हीने जाणीवपूर्वक हा वादग्रस्त भाग प्रसारित केला जेणेकरून त्यांची व्ह्यूअरशिप (प्रेक्षकसंख्या) वाढावी, असा आरोप सुकन्या यांनी केला होता. वीरप्पनने वापरलेले काही अपशब्द वाहिनीने म्यूट (म्युट) केले होते, परंतु सुकन्या यांचे नाव जोडणारा खोटा भाग मात्र मुद्दाम तसाच ठेवण्यात आला होता.
न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
न्यायमूर्ती बाबू यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले की, सन टीव्हीने वीरप्पनची तब्बल ९ तासांची मुलाखत रेकॉर्ड केली होती. त्यानंतर ती एडिट (बदल) करून ४ तासांची करण्यात आली आणि ८ दिवस ३०-३० मिनिटांच्या स्लॉटमध्ये दाखवण्यात आली. वाहिनीकडे हे सर्व एडिट करण्याचे पूर्ण अधिकार होते. त्यामुळे वृत्तवाहिनीने हे आरोप प्रसारित करण्यापूर्वी त्याची सत्यता तपासणे अत्यंत आवश्यक होते, असे न्यायालयाने म्हटले.
सन टीव्हीने या प्रकरणी एका तमिळ साप्ताहिकात (नक्किरन) माफी मागितली होती. मात्र, उच्च न्यायालयाने या माफीच्या प्रामाणिकपणावर शंका घेतली. न्यायालयाने म्हटले की, जर वाहिनीला खरोखर पश्चात्ताप झाला होता, तर त्यांनी ती माफी त्यांच्या स्वतःच्या टीव्ही चॅनेलवर दाखवायला हवी होती, जेणेकरून ती त्याच प्रेक्षकांपर्यंत पोहोचली असती ज्यांनी ती मुलाखत पाहिली होती.
सन टीव्हीचा बचाव फेटाळला
सन टीव्हीने न्यायालयात असा बचाव केला की, त्यांचा सुकन्या यांची बदनामी करण्याचा कोणताही हेतू नव्हता. वीरप्पनचे विचार हे त्याचे वैयक्तिक विचार होते आणि वाहिनीची त्यात काही जबाबदारी नव्हती, अशी पाटी (डिस्क्लेमर) त्यांनी लावली होती. तसेच ही मुलाखत पूर्वनियोजित नव्हती, असा दावाही वाहिनीने केला. मात्र, कनिष्ठ न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने हा बचाव फेटाळून लावला.
न्यायालयाने म्हटले की, सुकन्या एक सार्वजनिक व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे संरक्षण व्हायला हवे होते. वाहिनीने व्यावसायिक नफा कमावण्यासाठी निष्काळजीपणा केला आणि सुकन्या यांच्या आक्षेपानंतरही हा कार्यक्रम थांबवला नाही.
सुकन्या यांनी या बदनामीमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे म्हटले होते, परंतु त्यांनी न्यायालयात केवळ १०,००,५०० रुपयांची नुकसानभरपाई मागितली होती. तसेच या मुलाखतीवर कायमची बंदी घालण्याची विनंती केली होती, जी न्यायालयाने मान्य केली आहे.
