भारतातील सर्वच धर्मियांना गेल्या काही वर्षांमध्ये असहिष्णुतेचा सामना करावा लागला आहे. मात्र, या प्रकारामुळे महात्मा गांधीजींना निश्चितच धक्का बसला असता, असे उदगार अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी काढले आहेत. भारत हा सर्वोत्तम देश आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत ‘आमच्याच श्रद्धा खऱया’ या असहिष्णू धार्मिक धोरणामुळे सर्वच धर्मियांच्या श्रद्धास्थानांना येथे धक्का बसला आहे, अशी खंत ओबामा यांनी व्यक्त केली.
ओबामांची कानटोचणी
गेल्या महिन्याच्या शेवटी ओबामा यांच्या भारत दौऱयावेळी त्यांनी धार्मिक आधारावर विभाजित होत नाही तोपर्यंत भारत प्रगती करीत राहील’, असे मत व्यक्त केले होते. राज्यघटनेने दिलेला धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क हा भारत आणि अमेरिकेतला समान दुवा असून, धार्मिक स्वातंत्र्याची ही मूलभूत जबाबदारी सरकारनेही कसोशीने पाळली पाहिजे, असे त्यांनी दिल्लीतील एका भाषणामध्ये स्पष्ट केले होते. ओबामा यांच्या याच विधानावरून त्यावेळी विरोधकांनी सत्ताधाऱयांवर निशाणा साधला होता.
भाजपला तो टोमणा नव्हे!
ओबामा म्हणाले होते की, भारत आणि अमेरिकेने लोकशाही, धार्मिक स्वातंत्र्य ही मूल्ये जपली आहेत. जगात धर्माच्या नावाखाली दहशतवाद पसरवला जातो. आपल्याला फोडण्याचा प्रयत्न कुणी करीत असेल तर सावध राहिले पाहिजे. विविध धर्म ही एकाच बागेतील सुंदर फुले व एकाच वृक्षाच्या फांद्याही आहेत, असे महात्मा गांधींनी म्हटले होते, याचाही उल्लेख ओबामा यांनी त्यावेळी केला होता.