Gautam Adani: श्रीमंतांच्या यादीत आदाणींची चौथ्या स्थानी घसरण; Hindenburg च्या अहवालानंतर मोठा फटका! | adani enterprises loose 80000 crores after hindenburg research allegations | Loksatta

Gautam Adani: श्रीमंतांच्या यादीत अदाणींची चौथ्या स्थानी घसरण; Hindenburg च्या अहवालानंतर मोठा फटका!

अदाणी उद्योग समूहाला एका दिवसात ८० हजार कोटींचा फटका, जागतिक श्रीमंतांच्या यादीत चौथ्या स्थानी घसरण!

gautam adani hindenburg research fpo loss
गौतम अदाणींची जागतिक श्रीमंतांच्या यादीत घसरण! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

गेल्या दोन दिवसांपासून भारतीय बाजारपेठेत गौतम अदाणी आणि हिंडेनबर्गने जाहीर केलेला संशोधन अहवाल याची जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे. कारण या संशोधन अहवालामध्ये गौतम अदाणी आणि त्यांच्या उद्योग समूहावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत गौतम अदाणींची थेट चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. एवढंच नाही, तर एका दिवसात त्यांच्या बाजारातील भांडवलाचा आकडा ८० हजार ०७८ कोटींचा फटका बसून १८ लाख ३७ हजार ९७८ कोटींवर आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे २७ जानेवारी रोजी अदाणी उद्योग समूहाचे FPO बाजारात लाँच होत असून त्याच्या आधी अदाणींच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.

नेमकं घडलं काय?

न्यूयॉर्कमधील संशोधन संस्था Hindevburg Research नं गौतम अदाणींच्या कंपन्यांवर बुधवारी गंभीर आरोप केला. अदाणींच्या कंपन्यांकडून शेअर मार्केटमध्ये हस्तक्षेप करण्यात येत असून गेल्या काही दशकांपासून त्यांच्याकडून अनेक फसव्या योजना जाहीर करण्यात आल्याचा आरोप हिंडनबर्ककडून अदाणींवर करण्यात आला आहे. याचे तीव्र पडसाद बाजारपेठेत दिसून आले असून एका दिवसात अदाणींना तब्बल ८० हजार कोटींच्या बाजार भांडवलाचा फटका बसला आहे.

Jeff Bezos नं टाकलं मागे!

या अहवालानंतर एकाच दिवसात अदाणींना जागतिक श्रीमंतांच्या यादीत अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी मागे टाकलं आहे. याआधी अदाणी ११९ बिलियन अमेरिकन डॉलर्स इतक्या संपत्तीनिशी तिसऱ्या स्थानी होते. मात्र, १२० बिलियन डॉलर्स संपत्तीसह आता बेझोस तिसऱ्या स्थानी असून अदाणींची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. गेल्या तीन वर्षांत अदाणींच्या संपत्तीमध्ये तब्बल ८१९ टक्क्यांनी वाढ झाल्याचं सांगितलं जातं. गेल्या तीन वर्षांमध्ये अदाणींच्या संपत्तीमध्ये तब्बल १०० बिलियन डॉलर्सची वाढ झाली आहे.

हिंडेनबर्ग’चा फसवणुकीचे आरोप करणारा अहवाल; अदानी समूहातील कंपन्यांच्या बाजारभांडवलाचे ४६ हजार कोटींनी पतन

अदाणींच्या FPO ला फटका बसणार?

दरम्यान, हिंडबनर्गच्या या खळबळजनक आरोपांनंतर बाजारात येऊ घातलेल्या अदाणींच्या FPO ला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २७ जानेवारी रोजी म्हणजेच शुक्रवारी अदाणी एंटरप्रायजेसकडून तब्बल २० हजार कोटींचे एफपीओ खुल्या बाजारात खरेदीसाठी लाँच करणार आहेत. हा भारतातील सर्वात मोठा FPO असल्याचा दावा केला जातो. मात्र, त्याच्या दोन दिवस आधीच हिंडनबर्गनं हा आरोप केल्यामुळे या एफपीओला फटका बसू शकतो, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.

“FPOला टार्गेट करण्यासाठीच हा खटाटोप”

दरम्यान, FPO ला टार्गेट करण्यासाठीच हे आरोप करण्यात आल्याचा दावा अदाणी उद्योगसमूहाकडून करण्यात आला आहे. “अदाणी एंटरप्रायजेसच्या FPO चं नुकसान करण्याच्या एकमेव उद्देशाने अदाणी समूहाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा हा प्रयत्न केला जात असल्याचं दिसत आहे. मात्र, गुंतवणूकदारांनी नेहमीच अदाणी उद्योग समूहावर आपला विश्वास व्यक्त केला आहे”, असं अदाणी समूहाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.

अदानी समूहाच्या समभागांमध्ये घसरण किती?

हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहाच्या भांडवली बाजारातील सातही सूचिबद्ध कंपन्यांच्या समभागात मोठी घसरण झाली.

  • अदानी ग्रीन एनर्जी : १८५५.४५ ५८.१० (-३.०४ टक्के)
  • अदानी टोटल गॅस ३७४५ -१४०.४५ (-३.६१ टक्के)
  • अदानी विल्मर ५४४.५० -२८.५० (-५.०० टक्के)
  • अदानी ट्रान्समिशन २५३४.१० -२२२.१० (-८.०६ टक्के)
  • अदानी पोर्ट्स ७१२.९० -४७.९५ (-६.३० टक्के)
  • अदानी इंटरप्रायझेस ३३८९.९५ -५२.९० (-१.५४ टक्के)
  • अदानी पॉवर २६१.१० -१३.७० (-४.९९ टक्के)

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 16:49 IST
Next Story
Republic Day: पहिल्यांदाच नऊ राफेल विमानांची प्रात्यक्षिकं, जाणून घ्या आणखी खास काय काय घडलं?