पीटीआय, दावोस
अदानी समूहाने महाराष्ट्रात ६६ अब्ज डॉलरची गुंतवणूक योजना आखली असून ज्यामध्ये विमान वाहतूक, स्वच्छ ऊर्जा, शहरी पायाभूत सुविधा, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि प्रगत उत्पादन यांचा समावेश आहे.
दावोस येथे ५६ व्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ (डब्ल्यूईएफ) च्या वार्षिक बैठकीत आपल्या योजना सादर करताना, ऊर्जा संक्रमण, व्यवसाय सुलभता, उत्पादन स्वावलंबन या प्राधान्यांनुसार एकात्मिक, भविष्यासाठी तयार व्यासपीठ तयार करण्याच्या दिशेने एक बदल प्रतिबिंबित करते, असे समूहाने म्हटले आहे. अदानी एंटरप्रायझेसचे संचालक प्रणव अदानी यांनी पुढील सात ते १० वर्षांत नियोजित खर्चाची तरतूद केली जाईल असे स्पष्ट केले. अन्य प्रकल्पांमध्ये ३,००० मेगावॉट क्षमतेचे एकात्मिक डेटा सेंटर पार्क, ८,७०० मेगावॉट क्षमतेचे जलविद्याुत प्रकल्प आदींचा समावेश आहे.
धारावी पुनर्विकास केंद्रस्थानी
महाराष्ट्रात, प्रस्तावित गुंतवणूक मुख्यत्वे शहरी परिवर्तन आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांवर केंद्रित असून यामध्ये धारावीचा पुनर्विकास समाविष्ट आहे. दरम्यान, माहाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्या कोणत्याही गुंतवणूकदाराचे, मग तो अदानी समूहाचा असो किंवा इतर कोणीही असो, आम्ही स्वागत करू, कारण गुंतवणुकीशिवाय आपल्या तरुणांसाठी नोकऱ्या निर्माण होणार नाहीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पाच वर्षांत भारताचा विकास दर ६८ टक्के : वैष्णव
मध्यम चलनवाढ आणि मजबूत आर्थिक वाढीमुळे पुढील पाच वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था खऱ्या अर्थाने ६ ते ८ टक्के आणि सद्या:स्थितीत १० ते १३ टक्के दराने वाढत राहील, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी सांगितले. ‘बेटिंग ऑन इंडिया – बँक ऑन द फ्यूचर’ या चर्चासत्रात ते बोलत होते. या वेळी त्यांनी रवानगी प्रक्रिया सुलभ करण्याच्या महत्त्वावर भर दिला. टेलिकॉम टॉवर बसवण्यासाठी लागणारा सरासरी वेळ २७० दिवसांवरून सात दिवसांवर आला आहे आणि ८९ टक्के परवानग्या आता त्वरित दिल्या जात आहेत. त्यांनी उद्याोगांमधील आव्हानांच्या प्रभावी संवादाची गरजदेखील नमूद केली.
