गुजरातमधील अदानी बंदरावर (APSEZ) ३,००० किलोग्रॅम हेरॉईन ड्रग्ज सापडल्यानंतर अदानी समुहाने मोठा निर्णय घेतलाय. यानुसार यापुढे इराण (Iran),अफगाणिस्तान (Afghanistan) आणि पाकिस्तानमधील (Pakistan) मालवाहू जहाजांना अदानी बंदरावर प्रवेश बंद असेल. याची सुरुवात १५ नोव्हेंबरपासून होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अदानी समुहाने याबाबत अधिकृत भूमिका जाहीर केलीय. यात त्यांनी म्हटलंय, “१५ नोव्हेंबरपासून अदानी बंदर इराण, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून आलेल्या जहाजांना बंदरावर प्रवेश देणार नाही.” हा नियम अदानी समुहाकडून चालवल्या जाणाऱ्या सर्व बंदरांना लागू असणार आहे. पुढील नोटीस येऊपर्यंत या ३ देशांमधील जहाजांना अदानी पोर्टवर बंदी असेल.

अदानी बंदरावरील ड्रग्ज प्रकरण नेमकं काय?

सप्टेंबर २०२१ मध्ये गुजरातमधील अदानी समुहाकडून चालवल्या जाणाऱ्या मुंद्रा बंदरावर जवळपास ३,००० किलोग्रॅम हेरॉईन ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला होता. ज्या जहाजात या ड्रग्जची तस्करी करण्यात आली त्या जहाजात प्रक्रिया न केलेली टाल्क पावडर असल्याचं कागदोपत्री दाखवण्यात आलं होतं. मात्र, प्रत्यक्षात टाल्क पावडरच्या बॅगमध्ये हेरॉईन लपवून त्यावर टाल्क पावडरचं आवरण देण्यात आलं होतं. जेणेकरुन तपास यंत्रणांना या ड्रग्जचा तपास लागणार नाही.

हेही वाचा : गुजरातमधील ३००० किलो ड्रग्ज तस्करीप्रकरणी कारवाईला वेग, चेन्नईतील जोडप्याला कोठडी

इतकं करूनही हा मोठा ड्रग्ज साठा पकडण्यात यश आलं. यानंतर देशभरात ठिकठिकाणी या संदर्भात छापेमारी झाली. यात ८ जणांना अटक करण्यात आलं. त्यात अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तानच्या नागरिकांचाही समावेश आहे.

या प्रकरणात आतापर्यंत महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केलीय. २१ सप्टेंबरला दिल्लीत एकूण ६ आरोपींना अटक करण्यात आलीय. यात काही अफगाणिस्तानच्या नागरिकांचाही समावेश आहे. त्यांना दिल्लीत कोकेन आणि हेरॉईनसोबत अटक करण्यात आली होती. त्यांचा गुजरातमधील ड्रग्ज प्रकरणाशी संबंध आहे का हेही तपासलं जात आहे.

अदानी बंदरावर ड्रग्ज घेऊन आलेलं जहाज कोठून आलं?

कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बंदरावर १६ सप्टेंबर रोजी सापडलेली ही ३,००० किलोग्रॅम ड्रग्जची खेप मुळात अफगाणिस्तानातून इराणमार्गे भारतात पाठवण्यात आलं. इराणच्या बंदर अब्बास पोर्टवरुन २ कंटेनर भारतात पाठवण्यात आले होते. कागदोपत्री या कंटेनरमध्ये सेमी प्रोसेस्ड टाल्क स्टोन्स (Semi processed talk stones) असल्याचं भासवत ही मोठी ड्रग्ज तस्करी करण्यात आली. मात्र, महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) गुप्त माहितीच्या आधारे छापेमारी करत या तस्करीवर कारवाई केली.

देशभरात ठिकठिकाणी कारवाई, गुजरात केंद्रस्थानी

या कारवाईनंतर गुजरातमधील अहमदाबाद, गांधीधाम आणि मांडवी भागातही छापेमारीची कारवाई केली जात आहे. दिल्ली आणि चेन्नईतही या प्रकरणा कारवाई करण्यात आली. या अमली पदार्थांच्या तस्करीत अफगाणिस्तानी नागरिकांचा समावेश असल्याचा अंदाज आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “जहाजांमधील या कंटेनरमध्ये प्रक्रिया केलेले टाल्क स्टोन असल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच ही खेप चेन्नईतील जोडप्याकडून चालवण्यात येणाऱ्या आषी ट्रेडिंग कंपनीसाठी असल्याची नोंद होती. या कंपनीची नोंदणी मजवरम सुधाकर आणि वैशाली गोविंदराजू दुर्गा पूर्णा यांच्या नावे आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे होती.”

अदानी उद्योग समुहाकडून स्पष्टीकरण

अदानी उद्योग समुहाची मालकी असलेल्या अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिक झोनमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज साठा सापडल्यानंतर अदानी समुहाने स्पष्टीकरण दिलं होतं. यात त्यांनी म्हटलं होतं, “बंदर चालवणाऱ्या कंपनीची भूमिका केवळ बंदरावरील वाहतुकीचं नियोजन करण्याची आहे. आम्ही केवळ जहाजांना बंदरावरील सेवा देतो. मुंद्रा बंदरावरुन वाहतूक होणाऱ्या कंटेनर आणि कार्गो जहाजांची तपासणी करण्याचे अधिकार आम्हाला नाहीत.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adani group take big decision after 3000 kg heroin drugs found on mundra port pbs
First published on: 11-10-2021 at 16:14 IST