काँग्रेसप्रणीत युपीएचे अस्तित्व आहेच कुठे, असा सवाल करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रा ममता बॅनर्जी यांनी बुधवारी काँग्रेसला डिवचले. त्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या असता त्यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. भाजपा आणि काँग्रेस अशी थेट लढत होणाऱ्या राज्यांमध्ये भाजपाचा प्रभाव वाढत असल्याचं म्हणत त्यांनी भाजपाविस्ताराचे खापर काँग्रेसवर फोडले. तसेच भाजपाला समर्थ पर्याय निर्माण करण्याची गरज बोलून दाखवली. दरम्यान, ममता बॅनर्जींच्या या वक्तव्यावर काँग्रेसने पलटवार केला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जींना सुनावले आहे.

“ममता बॅनर्जींना यूपीए म्हणजे काय हे माहित नाही का? मला वाटते की त्यांनी वेडेपणा सुरू केला आहे. त्यांना वाटतंय की पूर्ण भारत ‘ममता, ममता’ म्हणू लागला आहे. परंतु भारत म्हणजे बंगाल नाही आणि बंगाल म्हणजे भारत नाही. पश्चिम बंगालमधील मागच्या निवडणुकांमध्ये त्यांनी वापरलेली युक्ती आता हळूहळू उघड होत आहेत,” असे अधीर रंजन चौधरी एएनआयशी बोलताना म्हणाले.

“२०१२ मध्ये यूपीए सरकारमध्ये सहा टीएमसी मंत्री होते. ममता बॅनर्जींनी यूपीएला दिलेला पाठिंबा काढून घेण्यासाठी काही कारणे त्यावेळी सांगितली होती. त्यांना त्यावेळी यूपीए सरकार पाडायचे होते. पण त्या यशस्वी झाल्या नाही, कारण इतर पक्षांनी लगेच सरकारला पाठिंबा दिला. ममता बॅनर्जींचे हे जुने षड्यंत्र आहे. आज मोदी त्यांच्या पाठीशी उभे आहेत, त्यामुळे त्यांची ताकद वाढली आहे. ममता काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे,” असा दावा चौधरी यांनी केला.