देशातील अनेक राज्यांमध्ये लागू करण्यात आलेल्या दारू आणि गोमांस बंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होत असल्याचे मत उद्योगपती आदी गोदरेज यांनी व्यक्त केले आहे. मोदी सरकारला सत्तेत येऊन दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आदी गोदरेज यांनी सरकारी धोरणांविषयी आपली भूमिका मांडली. गेल्या दोन वर्षांत उद्योगांसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. जीवनावश्यक गोष्टींच्या किंमतीत घट झाल्यामुळे उद्योगांना फायदाही होत आहे. भारतीय अर्थव्यवस्था वेगाने घौडदौड करत असून हळूहळू भारत शक्तिशाली विकसित देश म्हणून उदयाला येत आहे. मात्र, काही गोष्टींमुळे या विकास प्रक्रियेत बाधा येत आहे. उदाहरणार्थ काही राज्यांमध्ये असलेली गोमांस बंदी. त्यामुळे ग्रामीण आणि कृषी विकासावर विपरीत परिणाम होत आहे. गोमांस बंदीमुळे इतक्या गायींचे करायचे काय, हा प्रश्न निर्माण होतो. अनेक शेतकऱ्यांसाठी हा उत्त्पन्नाचा चांगला स्त्रोत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर आणि उद्योगांवर नकारात्मक परिणाम होत आहे, असे गोदरेज यांनी सांगितले.
वैदिक काळात भारतीय लोक गोमांस खात होते. भारतीय धर्माने गोमांसाला कधीही विरोध केलेला नाही. मात्र, दुष्काळाच्या काळात गोमांस न खाण्याची प्रथा पडली. याशिवाय, गायीची हत्या करू नका, तिचे दूध मुलांसाठी पोषक आहे, असे ज्येष्ठांकडून सांगितले जात होते. याच समजुतीचे पुढे धार्मिक मान्यतेत रूपांतर झाले. हे हास्यास्पद आहे. मात्र, वैदिक काळातील भारतीय गोमांस खायचे ही बाब तितकीच खरी असल्याचे आदी गोदरेज यांनी सांगितले.
या सगळ्या बंदीसाठी काही घटक कारणीभूत आहेत. निवडणुकांमध्ये महिलांची मते मिळवण्यासाठी केरळ आणि बिहार यांसारख्या राज्यांनी दारूबंदी लागू केली आहे. बंदी ही कोणत्याही अर्थव्यवस्थेसाठी आणि सामाजिक रचनेसाठी वाईट असते. त्यामुळे उलट दारूच्या बेकायदेशीर व्यापाराला आणि माफियांना चालना मिळेल, असे गोदरेज यांनी म्हटले.