काँग्रेसच्या रायबरेली सदरच्या आमदार अदिती सिंह यांनी बंडखोरी करत भाजपात प्रवेश केला. यानंतर अदिती सिंह यांनी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांना लक्ष्य केलंय. “जे भ्याड आहेत तेच लोक काँग्रेस सोडत आहेत असं प्रियंका गांधी म्हणतात. मात्र, यातून त्या संपूर्ण भारत भ्याड असल्याचं बोलत आहेत,” असं मत अदिती सिंह यांनी व्यक्त केलं. काँग्रेस सोडल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी यापुढेही माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी काम करत राहिल असं म्हटलंय.

प्रियंका गांधी यांनी काँग्रेस पक्ष सोडणाऱ्यांवर निशाणा साधत पक्ष सोडणारे भ्याड असल्याची टीका केली. यावर विचारलं असता अदिती सिंह म्हणाल्या, “याचा अर्थ त्या संपूर्ण भारत भ्याड लोकांचा देश आहे असं सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.” यावेळी अदिती सिंह यांनी आपण प्रियंका गांधी यांच्याविरोधात प्रचार करणार असल्याचंही सांगितलं.

“काँग्रेस पक्ष सोडणारी मी पहिली महिला नाही”

प्रियंका गांधी सध्या महिलांसाठी अनेक घोषणा करत आहेत. अशातच एका महिला आमदाराने पक्ष सोडल्यानं काँग्रेसला किती फटका बसेल यावर उत्तर देताना अदिती सिंह म्हणाल्या, “काँग्रेस पक्ष सोडणारी मी पहिली महिला नाही. आता काँग्रेसमध्ये उरलंच कोण आहे? काँग्रेसच्या धोरणांमध्येच खूप कमतरता आहेत. त्यामुळेच लोक पक्ष सोडून जात आहेत.”

“प्रियंका गांधी प्रत्येक गोष्टीवर राजकारण करतात”

प्रियंका गांधी यांनी कृषी कायद्यांवरून केलेल्या टीकेवरही अदिती सिंह यांनी प्रत्युत्तर दिलं. “प्रियंका गांधी प्रत्येक गोष्टीवर राजकारण करतात. त्यांना खरंच शेतकऱ्यांच्या मुद्द्याशी घेणंदेणं असतं तर कृषी कायदे मागे घेतल्यावर त्यांना आनंद झाला असता,” असं मत अदिती सिंह यांनी व्यक्त केलं.

“मोदी आणि योगींची कार्यशैली पाहूनच भाजपात प्रवेश”

कुणाच्या प्रभावातून भाजपात प्रवेश करत आहात असं विचारलं असता अदिती सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यामुळे खूप प्रभावित असल्याचं म्हटलं. तसेच त्यांची कार्यशैली पाहूनच भाजपात प्रवेश केल्याचं मत व्यक्त केलं.

हेही वाचा : तृणमूलचा काँग्रेसला दुहेरी धक्का; दोन बड्या नेत्यांचा ममता बॅनर्जींच्या उपस्थितीत पक्षप्रवेश!

अदिती सिंह यांना त्यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केल्यानं काँग्रेसला किती फटका बसेल असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी या प्रश्नाला थेट उत्तर देणं टाळलं. त्या म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात मी प्रामाणिकपणे काम करेन. माझा विचार सदर मतदारसंघातूनच निवडणूक लढण्याचा आहे. मात्र, पक्षाचे वरिष्ठ जो निर्णय घेतील त्यानुसार मी काम करेन.”