Advisory for American Citizens in the Middle East: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर प्रदेशात तणाव प्रचंड वाढला आहे. इराणनेही इस्रायल आणि अमेरिकेवर प्रतिहल्ला केला आहे. आखाती देशांतील बहुतांश विमानतळे सध्या बंद असून समुद्री वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला आहे.
या पार्श्वभूमीवर अमेरिकेने तातडीचा सल्ला जारी केला आहे. अमेरिकन नागरिकांना मध्य पूर्वेतील डझनभर देशांमधून “आताच निघून जाण्याचे” आवाहन करण्यात आले आहे. शक्य तितक्या लवकर १२ देश सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
‘एक्स’वरील पोस्टमध्ये व्हिडिओ संदेश शेअर करताना अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी “गंभीर सुरक्षा धोके” असल्याचे सांगत नागरिकांना मध्य पूर्वेतील अनेक देशांतून तात्काळ निघून जाण्याचे आवाहन केले आहे.
याशिवाय, कॉन्सुलर अफेयर्ससाठी सहाय्यक सचिव मोरा नॅमडर यांनीही ‘एक्स’वरील पोस्टमध्ये नमूद केले की, “गंभीर सुरक्षा धोक्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन नागरिकांना उपलब्ध व्यावसायिक वाहतुकीचा वापर करून खालील देशांतून तातडीने निघून जाण्याचे आवाहन करतात. ज्यांना व्यावसायिक मार्गाने बाहेर पडण्यासाठी परराष्ट्र विभागाची मदत हवी असेल त्यांनी २४/७ +१-२०२-५०१-४४४४ (परदेशातून) किंवा +१-८८८-४०७-४७४७ (अमेरिका आणि कॅनडातून) या क्रमांकांवर संपर्क साधावा.
‘हे’ देश सोडण्याचे आवाहन
२ मार्च रोजी दुपारी ४ वाजता अमेरिकन नागरिकांसाठी हा सल्ला देण्यात आला. पुढील देशांतून लवकरात लवकर बाहेर पडावे असे सांगण्यात आले आहे. त्यामध्ये बहरीन, कुवेत, इजिप्त, लेबनॉन, इराण, ओमान, इराक, कतार, इस्रायल, वेस्ट बँक आणि गाझा, सौदी अरेबिया, सीरिया, जॉर्डन, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन या देशांना समावे आहे.
अमेरिकेच्या सहा सैनिकांचा मृत्यू
दरम्यान, यूएस सेंट्रल कमांड (CENTCOM) ने पुष्टी केली की, प्रदेशातील सुरू असलेल्या संघर्षादरम्यान कारवाईत सहा अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला आहे. ‘एक्स’वरील पोस्टमध्ये ‘सेंटकॉम’ने म्हटले आहे, “२ मार्च रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत कारवाईत सहा अमेरिकन सैनिक ठार झाले आहेत. मोठ्या प्रमाणावर लढाऊ कारवाया सुरू आहेत. नातेवाईकांना माहिती दिल्यानंतर २४ तासांपर्यंत मृतांची ओळख जाहीर केली जाणार नाही.”
