scorecardresearch

“उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला तिथंच विषय संपला, कारण…”, हरिश साळवेंचा सर्वोच्च न्यायालयात आक्रमक युक्तिवाद

गुरुवारी (२ मार्च) झालेल्या सुनावणीत ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी अचानक सुनावणीत ऑनलाईन हजेरी लावली आणि आक्रमक युक्तिवाद केला. तसेच उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत राज्यपाल कसे बरोबर होते, अशी मांडणी केली.

Uddhav Thackeray Adv Harish Salve Eknath Shinde Supreme Court
उद्धव ठाकरे, हरिश साळवे, एकनाथ शिंदे, सर्वोच्च न्यायालय (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केल्यानंतर आता शिंदे गटाकडून युक्तिवाद होत आहे. शिंदे गटाकडून नीरज कौल यांनी बाजू मांडली. अशातच गुरुवारी (२ मार्च) झालेल्या सुनावणीत ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी अचानक सुनावणीत ऑनलाईन हजेरी लावली आणि आक्रमक युक्तिवाद केला. तसेच उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत राज्यपाल कसे बरोबर होते, अशी मांडणी केली. त्यानंतर सुनावणी संपणार असा अंदाज असतानाच सुनावणी वाढली. याबाबत ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना माहिती दिली.

ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे म्हणाले, “हरिश साळवे यांचं असं म्हणणं आहे की, उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला तिथंच विषय संपला आहे. कारण ते विधिमंडळासमोर गेलेच नाहीत. ते सभागृहाला सामोरं गेले असते तर काहीही होऊ शकलं असतं. १६ आमदारांच्या अपात्रतेचाच मुद्दा सर्वोच्च न्यायालयासमोर आहे. २२ आमदारांचा मुद्दा नंतर आला. सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांच्या कामात हस्तक्षेप करू शकत नाही.”

“राज्यपाल योग्य होते”

“हरिश साळवे यांचं असंही म्हणणं होतं की, राज्यपाल योग्य होते. त्यांनी उद्धव ठाकरे यांना बहुमत चाचणी घेण्यास सांगितलं. त्याला उद्धव ठाकरे नाही म्हटले. त्यानंतर राज्यपालांना पर्याय राहिला नाही. कारण सरकार कोसळलं होतं. त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदे यांना बोलावलं आणि शिंदेंनी बहुमत सिद्ध केलं,” असं सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितलं.

“अचानक हरिश साळवे यांची ‘एन्ट्री’ झाली आणि…”

“आज ही सुनावणी चार वाजता संपणार होती. शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांच्यानंतर मनिंदर सिंह, जेठमलानी युक्तिवाद करतील आणि मग सिब्बल व सिंघवी अखेरचा युक्तिवाद करतील असं ठरलं होतं. मात्र, अचानक हरिश साळवे यांची ‘एन्ट्री’ झाली आणि त्यांनी चौकार-षटकार मारायला सुरुवात केली,” असंही शिंदेंनी नमूद केलं.

हेही वाचा : सरन्यायाधीशांनी शिंदे गटाचा ‘तो’ दावा नाकारला, १० व्या परिशिष्टाचा दाखला देत म्हणाले…

“सर्वोच्च न्यायालयाने कुठलेही प्रश्न सोडवण्याची गरज नाही, केवळ…”

सिद्धार्थ शिंदे पुढे म्हणाले, “साळवे असंही म्हणाले की, हे प्रकरण ‘अकॅडमिक’ झालं आहे. आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण प्रलंबित आहे. त्या आमदारांनी नंतर विधेयकांवर मतदान केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने कुठलेही प्रश्न सोडवण्याची गरज नाही, केवळ १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा अध्यक्षांकडे सोपवावा. ते म्हणाले की नबाम रेबिया प्रकरण मी असं वाचतो की, अध्यक्षांविरोधा अविश्वास प्रस्ताव दाखल झाला असला तरी न्यायालय अध्यक्षांना कधीही थांबवत नाही आणि अध्यक्ष त्यांचं काम करू शकतात.”

“साळवेंनी आक्रमकपणे आपला युक्तिवाद केला आणि…”

“साळवेंनी आक्रमकपणे आपला युक्तिवाद केला आणि त्यामुळे वेळापत्रक बिघडलं. त्यामुळे आता होळीच्या सुट्टीनंतर यावर सुनावणी होईल. त्यामुळे १४ मार्चला यावर सुनावणी होईल,” असंही सिद्धार्थ शिंदे यांनी नमूद केलं.

हेही वाचा : अध्यक्षांनी एकनाथ शिंदेंना अपात्र ठरवलं नाही म्हणून ते मुख्यमंत्री? कायदातज्ज्ञ उज्जल निकम म्हणाले…

दरम्यान, गुरुवारी (२ मार्च) सुनावणी संपेल असं वेळापत्रक स्वतः सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आखून दिलं होतं. मात्र, ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी ऑनलाईन पद्धतीने या सुनावणीला हजेरी लावत आक्रमक युक्तिवाद केला आणि हे वेळापत्रक बदललं. साळवेंच्या युक्तिवादानंतर दिवसभराची सुनावणी दोन तासात संपली आणि पुढील सुनावणी होळीनंतर १४ मार्चपर्यंत पुढे गेली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-03-2023 at 16:57 IST