अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर नागरिकांचं स्थलांतर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. बाहेर देशातील नागरिक जे अफगाणिस्तानमध्ये अडकले आहेत, त्यांनादेखील त्यांच्या मायदेशी नेण्यात येत आहे. तसेच अनेक देश अफगाणिस्तानमधील नागरिकांना आश्रय देत असून त्यांनादेखील बाहेर काढत आहेत. अशीच एक अफगाणी महिला देश सोडताना विमानतळावर रडू लागली. “मला आणि माझ्या देशाला माहित आहे की मी पुन्हा कधीच परतणार नाही,” असं म्हणत तिला अश्रू अनावर झाले.

वहिदा फैझी असं या महिलेचं नाव असून ती पत्रकार आहे. देशाबाहेर जाण्यासाठी काबूल विमानतळावर प्रवेश करण्याची वाट पाहत असताना या महिलेने या महिला पत्रकाराने बीबीसीशी संवाद साधला. “माझं माझ्या देशावर खूप प्रेम आहे मात्र मी इथं राहू शकत नाही. मला इथं मोकळा श्वास घेता येत नाही. तालिबान्यांना माहित आहे की मी कोण आहे. त्यामुळे ते मला शोधून काढतील आणि मारून टाकतील. ते मला खरंच मारून टाकतील. माझं भविष्य या देशात राहिलेलं नाही. माझं माझ्या देशावर प्रचंड प्रेम आहे, पण मला जावं लागेल.” यावेळी काबुल विमानतळाच्या प्रवेशद्वाराकडे जाताना तिने अफगाणिस्तानात कधीही परत न येण्याचे वचन दिले. “यानंतर, हा माझा देश नाही” असं म्हणताना वहिदा फैजी यांना अश्रू अनावर झाले होते.

तालिबान राजवटीतील अत्याचारांचे जुने दिवस पाहिल्यास अफगाणिस्तानमध्ये सर्वात जास्त भीती महिलांना आहे. तालिबानी महिलांच्या मूलभूत हक्क आणि अधिकारांवर गदा आणतील. त्यामुळे अफगाणी महिला आपल्या मुलाबाळांसह तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक महिलांनी आपल्या मुलांचे आयुष्य आणि भविष्य सुरक्षित करण्यासाठी विमानतळाच्या काटेरी तारांवरून आपल्या फेकून दुसरीकडे पाठवण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, तालिबानच्या राजवटीखालील अफगाणिस्तानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत हजारो अफगाणी नागरिक रोज काबूल विमानतळाच्या काटेरी दरवाजांबाहेर जमत आहेत.