“तू माझ्या डोक्यात गोळी झाड, पण मला तालिबान्यांसोबत…”, अफगाणी पॉपस्टार आर्याना सय्यदचा थरारक अनुभव!

अफगाणिस्तानवर तालिबान्यांचं वर्चस्व प्रस्थापित झाल्यानंतर काबूल सोडताना आलेला थरारक अनुभव पॉपस्टार आर्यानानं सांगितला आहे.

Afghan pop star Aryana Sayeed
पॉपस्टार आर्याना सय्यदनं सांगितली आपबीती!

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर आता जागतिक पातळीवर तेथील मानवी हक्कांविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषत: तालिबानी महिलांवर लादले जाणारे निर्बंध चर्चेचा विषय ठरले आहेत. मुळात तालिबानी महिलांना फारसे अधिकार देण्याच्या बाजूने नसताना एखाद्या महिला पॉप सिंगरसाठी तर तालिबान्यांच्या ताब्यात असलेल्या अफगाणिस्तानमधला प्रवास भयंकरच असू शकतो, याची सहज कल्पना येऊ शकेल. अफगाणी पॉप स्टार आर्याना सय्यदनं अफगाणिस्तानमधून पलायन करतानाचा एक थरारक अनुभव शेअर केला असून अफगाणिस्तानात नेमकी कशी परिस्थिती असावी, याचा त्यावरून अंदाज यावा.

दोन वेळा केला पलायनाचा प्रयत्न!

आर्याना सय्यद अफगाणिस्तानमधून पलायन करून सध्या इस्तांबूलमध्ये त्यांच्या होणाऱ्या पतीसोबत राहात आहे. मात्र, तालिबान्यांनी काबूलवर ताबा मिळवला, तेव्हा आर्याना काबूलमध्येच होती. काबूलमधून बाहेर पडण्यासाठी आर्यानानं दोन वेळा प्रयत्न केले. दुसऱ्या वेळी एका लहानशा मुलीमुळे तिचा प्लान यशस्वी झाला, असं देखील आर्यानानं सांगितलं आहे.

आर्यानानं सांगितल्यानुसार, तिनं काबूल सोडण्याचा पहिला प्रयत्न १५ ऑगस्ट रोजी केला होता. याच दिवशी तालिबाननं काबूलवर ताबा मिळवला होता. मात्र, ज्या विमानातून ती काबूल सोडणार होती, त्या विमानानं नंतर उड्डाण केलंच नाही. त्यानंतर पुन्हा १६ ऑगस्टला तिनं काबूल विमानतळ गाठलं. यावेळी मात्र एका चिमुकल्या मुलीमुळे तिचे प्राण वाचल्याचं ती म्हणाली.

त्या दिवशी विमानतळावर भरपूर गर्दी होती…!

आर्याना म्हणते, “त्या दिवशी काबूल विमानतळावर भयंकर गर्दी होती. आम्ही विमानतळात प्रवेश देणं सुरू होण्याची वाट पाहात होतो. त्याचवेळी माझ्या मांडीवर एक लहानगा येऊन बसला. हीच संधी साधून मी प्लान केला. मी त्या मुलाला सांगितलं की जर आपल्याला थांबवलं, तर तू फक्त त्यांना सांगायचं की मी तुझी आई आहे आणि माझं नाव आर्याना नसून फ्रेश्ता आहे”. नशीबानं साथ दिली आणि अमेरिकी सैनिकांनी त्यांना विमानात जाऊ दिलं.

पण सुटका झाल्यानंतर देखील आर्याना तो थरारक अनुभव विसरलेली नाही. ती म्हणाली, “आम्ही जेव्हा घरातून बाहेर पडत होतो, तेव्हा मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला सांगितलं होतं की जर तालिबान्यांनी आपल्याला पकडलं आणि ते मला घेऊन जायला लागले, तर तू माझ्या डोक्यात गोळी घाल, पण मला त्यांच्यासोबत जिवंत जाऊ देऊ नकोस”!

पंजशीरमध्ये तालिबान्यांशी अद्यापही लढत आहेत अहमद मसूद; टर्कीमध्ये पळून गेल्याची माहिती आली होती समोर

२६ वर्षीय आर्यानानं अफगाणिस्तानमधील पाकिस्तानच्या हस्तक्षेपाविषयी वारंवार आक्षेप नोंदवला आहे. शिवाय, नुकत्याच जाहीर झालेल्या तालिबानी मंत्रिमंडळावर सर्वसमावेशक नसल्याची टीका देखील तिने केली आहे. “अफगाणिस्तानमधल्या सध्याच्या महिला या २० वर्षांपूर्वीच्या महिलांपेक्षा खूप वेगळ्या आहेत. त्यांना हे नक्कीच मान्य होणार नाही”, असं देखील आर्याना म्हणाली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Afghan pop star aryana sayeed experience leaving kabul on 15th august pmw