“भूतकाळात केलेली ती चूक मी पुन्हा घडू देणार नाही, अफगाणिस्तान लष्करच…”; बायडेन यांचा निर्धार

बायडेन यांनी अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी बोलवण्याचा निर्णय हा अमेरिकेतील नागरिकांचा विचार केल्यास योग्यच असल्याचं म्हटलं आहे.

US President Joe Biden
आपली भूमिका बायडेन यांनी पुन्हा स्पष्ट केली

अफगाणिस्तानात  तालिबानने अपेक्षेपेक्षा फार लवकर सत्ता काबीज केली तरी तेथून सैन्य माघारीच्या निर्णयावर आपण ठाम आहोत, असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी मंगळवारी म्हटले होते. त्यानंतर आता बायडेन यांनी अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी बोलवण्याचा निर्णय हा अमेरिकेतील नागरिकांचा विचार केल्यास योग्यच असल्याचं म्हटलं आहे. अफगाणिस्तानमधील लोक त्यांच्या हक्कासाठी लढण्यास तयार नसताना आपण आपल्या सैन्याला त्या युद्धभूमीमध्ये का पाठवावे असा प्रश्न उपस्थित करत आधी केलेली चूक आपण करणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

जो बायडेन यांनी अमेरिकेतील आणखीन किती पिढ्या आपण अफगाणिस्तानमधील युद्धामध्ये लढण्यासाठी पाठवणार आहोत असा प्रश्न उपस्थित केलाय. “अफगाणिस्तानचे लष्करच लढण्यास तयार नाही तर आपण अमेरिकन मुली आणि मुलांच्या किती पिढ्या अफगाणिस्तानमधील युद्ध लढण्यासाठी पाठवात राहणार आहोत? मला यासंदर्भातील माझं उत्तर योग्य वाटतं. आपण यापूर्वी भूतकाळात केलेली चूक मी पुन्हा घडू देणार नाही,” असं जो बायडेन म्हणाले आहेत. आपण आपल्या निर्णयावर ठाम असून तोच अमेरिकेच्या दृष्टीने हिताचा असल्याचं बायडेन यांनी म्हटलंय.

मंगळवारी बायडेन यांनी व्हाइट हाऊस येथून देशाला उद्देशून केलेल्या भाषणात सांगितले की, “अफगाणिस्थान सरकार तालिबानच्या दबावामुळे नाट्यमयरीत्या कोसळले असून तेथील भयानक परिस्थितीला अमेरिका जबाबदार नाही. तेथे काही लोक विमानांच्या पंखांना पकडून लोंबकळताना दिसल्याची दृश्ये प्रसारित झाली आहेत. अफगाणिस्तानातील दृश्ये काळीज गोठवून टाकणारी आहेत. पण अमेरिकी सैन्य माघारीसाठी यापेक्षा कुठली वेगळी वेळ चांगली होती असे वाटत नाही, सैन्य माघारीच्या निर्णयावर आपण ठाम आहोत. त्याच्या परिणांची जाणीव असल्यानेच आम्ही आपत्कालीन उपाययोजना केल्या होत्या. आपण अमेरिकी लोकांच्या पाठीशी आहोत. अमेरिकेचे समर्थन असलेले सरकार व लष्कर यांनी तालिबानला सत्ता घेऊ दिली. अपेक्षेपेक्षा जास्त लवकर तालिबानने हे करून दाखवले,”

पुढे बोलताना बायडेन यांनी, “अफगाणिस्तानच्या नेत्यांनी पलायन केले. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी हे तालिबानने कब्जा करण्यापूर्वीच तेथून पळून गेले होते,” असंही म्हटलं. बायडेन म्हणाले की, “अफगाणी दले लढण्याची क्षमता दाखवत नसताना तेथे अमेरिकी सैन्याला मरू देणे आम्हाला योग्य वाटले नाही. अफगाण लष्कर तालिबानपुढे कोसळले. त्यांनी प्रतिकारही केला नाही. गेल्या आठवड्यातील घटनांमुळे अफगाणिस्तानातून अमेरिकेने लष्कर मागे घेतल्याबाबत नाराजी व्यक्त केली जात असली तरी त्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Afghan troops will not fight civil war why we should send out army there asks us president joe biden scsg