अफगाणिस्तानात तालिबाननं सत्ता प्रस्थापित केल्यानंतर दहशतीचं वातावरण आहे. तालिबान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याची पार्श्वभूमी असल्याने अनेक जण देश सोडून पलायन करत आहेत. त्यातच आता तालिबाननं आपलं खरं रूप दाखवण्यास सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानातील काबूल विमानतळाबाहेर दोन आत्मघातकी हल्ले झाले आहेत. या हल्ल्याची खात्री पेंटागन प्रवक्त्यांनी केली आहे. एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार दोन हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. त्याचबरोबर तीन अमेरिकन सैनिकांसह १५ जण जखमी झाल्याची माहिती आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटेननं काबूल विमानतळावर दहशतवादी हल्ल्याची भीती व्यक्त केली होती. त्याचबरोबर आपल्या देशातील नागरिकांना विमानतळापासून दूर राहण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.

“काबूल विमानतळाच्या ऐबी गेटच्या बाहेर आत्मघातकी हल्ला झाला. हल्लेखोर गोळीबार करत आला आणि स्वत:ला स्फोटकांनी उडवलं. विमानतळाच्या या गेटवर ब्रिटनचे सैनिक तैनात होते. तर दुसरा आत्मघातकी हल्ला हॉटेलबाहेर झाला. पाश्चिमात्य देशातील सैनिकांना लक्ष्य करत असल्याचं दिसत आहे.”, असं अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. काबूलनंतर कझाकिस्तानच्या ताराज शहरात स्फोट झाल्याची सूत्रांची माहिती आहे. एका लष्करी तळावर हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, आत्मघातकी हल्ल्यापूर्वी काबूल एअरपोर्टवर इटलीच्या एका विमानावर गोळीबार करण्यात आला होता. या विमानात अफगाणिस्तानातील १०० शरणार्थी होते. दरम्यान ३१ ऑगस्टला अमेरिकी सैन्य अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यापूर्वी एक सरकार अस्तित्वात येईल, असं मुजाहिद यांनी मुलाखतीत सांगितलं. “आमच्यासाठी पाकिस्तान दुसरे घर आहे. आम्ही त्यांच्यासोबत व्यापार आणि सामरिक संबंध अधिक दृढ करण्याचे वचन दिले आहे,” असे तालिबानचे प्रवक्ते झबिहउल्लाह मुजाहिद यांनी बुधवारी म्हटलंय. तसेच तालिबानला भारताशी चांगले संबंध प्रस्थापित करायचे आहेत, असंही ते म्हणाले. “अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमा लागून आहेत. धर्माच्या बाबतीतही आम्ही पारंपारिकपणे जोडलेलो आहोत. दोन्ही देशांचे लोक एकमेकांमध्ये मिसळले आहेत. त्यामुळे आम्ही पाकिस्तानसोबतचे संबंध अधिक दृढ करण्यास उत्सुक आहोत,” असे मुजाहिद यांनी पाकिस्तानमधील एआरवाय न्यूजला  दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले.