पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद तालिबानच्या सरकार स्थापनेच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर  काबूलला पोहोचले आहेत. शनिवारी संध्याकाळी त्यांनी अफगाणिस्तानचे माजी पंतप्रधान गुलबुद्दीन हेकमत्यार यांची भेट घेतली. हेकमत्यार हे तालिबाननंतर अफगाणिस्तानमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी संघटना हिज्ब-ए-इस्लामीचे प्रमुख आहेत. पाकिस्तानच्या इशाऱ्याचे पालन करणारे हेकमत्यार तालिबानला सरकार स्थापनेसाठी मदत करत आहेत.

अफगाणमधील टोलो न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, आयएसआय प्रमुख आणि हेकमत्यार यांनी त्यांच्या बैठकीत अफगाणिस्तानमध्ये सर्वसमावेशक सरकार बनवण्यासह अनेक विषयांवर चर्चा केली. अफगाणिस्तानमध्ये भारत, अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांच्या भूमिकेबद्दल दोघांनीही चर्चा केल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. पाकिस्तानच्या गुप्तचर प्रमुखांच्या काबूल भेटीबाबत भारतही सावध आहे.

अफगाणिस्तानचे माजी पंतप्रधान गुलबुद्दीन हेकमत्यार हे सुरुवातीपासूनच भारतविरोधी आहेत. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यापासून त्यांनी भारताविरोधात अनेक विधाने केली आहेत. अफगाणिस्तानमधील भारताची पकड कमकुवत करण्यासाठी हेकमत्यार पाकिस्तानशीही डाव खेळू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – तालिबान विरोधकांना आश्रय दिलात तर महागात पडेल; अफगाणी नेत्याचा भारताला इशारा

गुलबुद्दीन हेकमत्यार यांनी काही दिवसांपूर्वी अफगाणिस्ताबाबत भारताकडून माफी मागण्याची मागणी केली होती. ते म्हणाले की, भारताने यापूर्वी सोव्हिएत युनियनने अफगाणिस्तानवर केलेल्या हल्ल्याला पाठिंबा दिला होता. त्यामुळे भारताने माफी मागावी. जशी इम्रान खान यांनी अमेरिकेला पाठिंबा देण्याच्या वक्तव्यावर मागितली होती.

“तालिबान विरोधकांना भारताने आश्रय देऊ नये. यापासून त्यांनी लांब राहीलं पाहीजे. तालिबान विरोधात आश्रय देऊन सरकारविरोधात व्यासपीठ देण्यासारखं आहे. त्यामुळे तालिबानला कृती करणं भाग पडेल.”, असा इशारा देखील गुलबुद्दीन हेकमत्यार यांनी सीएनएन न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत भारताला दिला होता.