पंजशीर खोऱ्यात बंडखोरांचे नेतृत्व करत असलेले अहमद मसूद आणि माजी उपराष्ट्रपती अमरूल्लाह सालेह हे ताजिकिस्तानला पळून गेल्याचा दावा तालिबानने केला आहे. तालिबानचा प्रवक्ता झबीउल्लाह मुजाहिद्दीनने ही माहिती दिली. यापुर्वी अमरूल्लाह हे गुप्त ठीकाणी असून लढाईचे नेतृत्व करत आहेत, अशी माहिती समोर आली होती.

तालिबानच्या मोहिमेची प्रगती पाहून अमरुल्ला सालेह यांनी देश सोडला असल्याची चर्चा आहे. पण सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सालेहने त्यांचे स्थान आणि पंजशीरच्या स्थितीबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. पंजशीरचे नेते अहमद मसूद यांनी ट्विट केले आहे की, ते सुरक्षित आहेत. अमरुल्ला सालेह युद्ध चालू ठेवण्याबद्दल आणि तालिबानला शरण न जाण्याबद्दल बोलत आहेत.

दरम्यान, तालिबानचे म्हणणे आहे की, ते अफगाणिस्तानमधील परिस्थिती सामान्य करण्याचा प्रयत्न करत आहे. लवकरच काबूलमधून इतर देशांसाठी उड्डाणे सुरू होतील. यामुळे अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या लोकांना दिलासा मिळेल. याशिवाय, अफगाणिस्तानचा जगाशी संपर्क पुन्हा पूर्ववत होईल.

तसेच पंजशीरवर ताबा मिळवल्याचा दावा केल्यानंतर तालिबानने धमकी वजा इशारा देखील दिला आहे. “जर कोणी समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करेल त्याला पंजशीरप्रमाणे हाताळले जाईल”, असा इशारा तालिबानने दिला आहे.

हेही वाचा – तालिबान सरकार स्थापनेच्या कार्यक्रमात चीन, टर्कीसह सहा देशांना निमंत्रण; भारताला…!

झबीउल्लाह मुजाहिद्दीनने केलं पत्रक जारी

दरम्यान, तालिबानचा प्रवक्ता झबीउल्लाह मुजाहिद्दीनने एक पत्रक देखील जारी केलं आहे. “आमच्या शत्रूच्या ताब्यात असणारा पंजशीर प्रांत आम्ही पूर्णपणे ताब्यात घेतलाय. देवाने आणि देशाने दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर देशातील प्रत्येक प्रांताला सुरक्षा पुरवण्यासाठी आम्ही करत असणाऱ्या या प्रय़त्नांना यश आलं आहे,” असं पत्रकात म्हटलं आहे.

हेही वाचा – “आमच्या मार्गात जर कुणी अडथळे आणले, तर…”, पंजशीरवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानचा धमकी वजा इशारा!

नॉर्दन अलायन्ससाठी लढणाऱ्या अनेकांना आम्ही मारहाण केली तर बरेच जण पळून गेल्याचा उल्लेखही या पत्रात आहे. तसेच पंजशीरमध्ये नॉर्दन अलायन्सच्या दबावाखाली असणाऱ्या स्थानिकांची सुटका करण्यात आम्हाला यश आल्याचा आनंद आहे, असा दावाही तालिबानने केलाय. “त्यांची सुटका करण्यात आली आहे. तसेच पंजशीरमधील सर्व नागरिकांचा सन्मान केला जाईल. त्यांच्याशी दुजाभाव केला जाणार नाही. ते सर्वजण आमचे बांधव आहेत. आमच्या देशाची सेवा करणं हे आमचं समान उद्दीष्ट आहे. या नुकत्याच मिळालेल्या विजयामुळे देश युद्धामधून पूर्णपणे बाहेर पडला आहे. आता देशातील नागरिक शांततेत, स्वातंत्र्याच्या वातावरणात आणि मुक्तपणे समृद्धी असणारं जीवन जगतील,” असा विश्वास तालिबानने व्यक्त केला.